संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय : सुरुवातीची तीस मिनिटे हायस्पीड
पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये आणि थांब्यावर येत्या काळात मोफत वायफाय उपलब्ध होणार आहे. याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांत दोन हजारहून अधिक बसेसद्वारे तीनशेहून अधिक मार्गांवर बससेवा पुरवण्यात येते. तर, शहर आणि आसपासच्या परिसरात सुमारे दीड हजारांहून अधिक बसथांबे आहेत. नागरिकांना वातानुकूलित प्रवास करता यावा, इलेक्ट्रिक बसेसद्वारे सेवादेखील देण्यात येते. आता पीएमपी प्रशासनाने बसेस आणि थांब्यांवर प्रवाशांना मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाला. यामुळे पीएमपीचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.
विमानतळांवर प्रवाशांना विशिष्ठ वेळेत वायफाय सुविधा देण्यात येते. याच धर्तीवर या सेवेंतर्गत थांब्यांवर प्रवाशांना सुरुवातीची तीस मिनिटे हायस्पीड वायफाय उपलब्ध होणार आहे. त्यानंतर कमी स्पीडमध्ये वायफाय सुरू राहणार आहे. हायस्पीड वायफाय सुविधा हवी असणाऱ्या नागरिकांना यासाठी
ठराविक दर आकारण्यात येणार आहे, अशी माहिती पीएमपी प्रशासनाने दिली.
पीएमपी बसेसमधून कुरिअर सेवा
पीएमपी प्रशासनाकडून बसेसमधून कुरिअर सेवा सुरू करण्याबाबतचे नियोजन करण्यात येत आहे. येत्या काळात याबाबत अंतिम निर्णय होणार आहे. लॉकडाऊन काळात पीएमपीची प्रवासी सेवा बंद होती. या कालावधीत केवळ 87 बसेसचे संचलन सुरू होते. तर, 3 सप्टेंबरपासून 25 टक्के म्हणजेच 421 बसेसचे संचलन सुरू झाले. मात्र, यातून मिळणारे उत्पन्न अत्यल्प आहे. यामुळे आर्थिक फटका बसत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने उत्पन्नवाढीसाठी अन्य पर्यायांची चाचपणी सुरू केली आहे.
एसटी प्रशासनाने जुलैपासून मालवाहतूक केली. याच धर्तीवर पीएमपीकडूनदेखील मालवाहतूक करण्याची सुरुवात झाली. यानंतर कार्गो पार्सल (कुरिअर) वाहतूक सुरू करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. मोटार वाहन कायद्यातील तरतुदींचा देखील अभ्यास करण्यात येणार आहे. यासह सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट (सीआयआरटी) या राष्ट्रीय संस्थेची मदतही घेण्यात येणार आहे. संस्थांचा अभिप्राय घेऊन यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.