पुणे – समर्थ पोलिसांच्या सतर्कतेमुळे एक सराईत वाहनचोर जेरबंद झाला आहे. त्याच्याकडून चोरीची चार वाहन हस्तगत करण्यात आली. संबंधीत वाहन चोरास संशयावरुन ताब्यात घेण्यात आले होते. पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्याने वाहनचोरीची कबुली दिली. त्याच्याविरुध्द समर्थ पोलीस ठाण्यात दोन, फरासखाना पोलीस ठाण्यात एक आणी दिघी पोलीस ठाण्यात एक असे चार वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
रवि जितेंद्र सरोदे(30,रा.दिपा लॉज समोर, गणेश पेठ) असे अटक आरोपीचे नाव आहे. समर्थ पोलीस ठाण्याचे पथक साध्या वेषात गस्त घालत असताना त्यांना सरोदे एका इमारतीच्या ठिकाणी संशयास्पदरित्या हालचाल करताना दिसला होता.
त्याला त्याच्या जवळील गाडीसंदर्भात विचारपूस केली असता, त्याने सुरवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. यामुळे त्याला पोलीस ठाण्यात आणून सविस्तर चौकशी केल्यावर त्याने गाडी चोरीची असल्याची कबुली दिली. त्याने आणखी तीन चोरीच्या गाड्याही पोलिसांच्या ताब्यात दिल्या. या दुचाकींची किंमत सुमारे 95 हजार आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त मिलींद पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, पोलीस कर्मचारी सुशिल लोणकर, संतोष काळे, पिंगळे, सुमित खुट्टे, सचिन पवार, निलेश साबळे, दत्ता सोनवणे, हेमंत पेरणे व सुभाष मोरे यांच्या पथकाने केली.