कोलकाता – पश्चिम बंगालमधील भाजप नेते व भाजपचे नवनियुक्त राष्ट्रीय सचिव अनुपम हाजरा यांनी अलीकडेच, आपल्याला जर करोना झाला तर आपण ममता बॅनर्जी यांना मिठी मारू, असे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.
त्यांच्या या वक्तव्याचा संपूर्ण देशात निषेध झाला होता. पण आजची बातमी अशी आहे की, खरंच त्या नेत्याला करोना झाला आहे. त्यांच्यावर अलीकडेच करण्यात आलेल्या करोना चाचणीने हे निष्पन्न झाले आहे.
खुद्द हाजरा यांनीच सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. आपण करोनाग्रस्त झालो आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांना आता कोलकात्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
हाजरा हे तृणमूल कॉंग्रेसचे माजी खासदार आहेत. त्यांनी जानेवारी महिन्यातच तृणमूल कॉंग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. करोनाग्रस्त नागरिकांचे खरे दु:ख ममतांना कळावे व या रोगात प्राण गमावलेल्या रुग्णाच्या कुटुंबीयांचे काय हाल होतात हे ममतांना कळावे म्हणून उद्या मला जर करोना झाला तर मी त्यांना जाऊन मिठी मारेन, असे ते म्हणाले होते.
त्यांच्यावर या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांच्या या वक्तव्यापासून भाजपने स्वत:ला दूर ठेवले होते. तसेच भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना संयमाने बोलण्याचा सल्ला दिला होंता.