पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी 1 ऑगस्टला सीरम इन्स्टिट्यूटमध्ये येऊन कोरोनावरील लस बनवण्याचं काम कसं सुरु आहे? याची माहिती घेतली होती. त्यानंतर शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटला भेट दिली. गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवारांनी सीरम इन्स्टिट्यूटला दिलेली ही दुसरी भेट आहे.
पण, त्यानंतर सर्वत्र शरद पवारांनी तिथे तयार करण्यात आलेली कोरोनावरील लस घेतल्यामुळे बिनधास्त राज्यभर दौरे करत आहेत, अशा अफवा पसरल्या होत्या. परंतु आजच्या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
शरद पवार यांनी सांगितले की, मी कोरोनावरील लस घेतली असे लोक म्हणत आहेत, परंतु ते खरं नाही, केवळ अफवा आहेत. सीरम इन्स्टिट्यूट कडे आत्ता रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठीचे बीसीजी इंजेक्शन आहे. ते इंजेक्शन आज मी घेतले आहे. माझ्यासोबत माझ्या स्टाफनेदेखील हे इंजेक्शन घेतले आहे. मात्र ही कोरोनाची लस नाही, तर रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठीचे इंजेक्शन आहे. सीरम इन्स्टिट्यूटची कोरोनावरील लस यायला जानेवारी उजाडेल, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, शरद पवारांनी या भेटीत सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार करण्यात येत असलेल्या कोरोनावरील लसीच्या कामाची प्रगती कुठपर्यंत पोहचलीय यांची माहिती घेतली.