पुणे – नामांकित महाविद्यालयात प्रवेशाच्या बहाण्याने फसवणूक केल्यानंतर रक्कम हवाला रॅकेटद्वारे इतर साथीदारापर्यंत पोहोचविल्याप्रकरणात एकाला अंतरिम अटकपूर्व जामीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एम. आगरकर यांनी दिला आहे.
शैलैंद्रे गणेशे असे त्याचे नाव आहे. त्याने ऍड. पुष्कर एन. पाटील आणि ऍड. अनुज मंत्री यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. नामांकित महाविद्यालयात एमबीएला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने 65 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा कोथरूड पोलिसात दाखल आहे. या प्रकरणात शैलेंद्र याच्यातर्फे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.
शैलेंद्र याचे नाव एफआयआरमध्ये नाही. तो पोलिसांनी बोलाविल्यास तपासास येण्यास तयार असल्याचा युक्तीवाद ऍड. पुष्कर पाटील आणि ऍड. अनुज मंत्री यांनी केला. दरम्यान तपास अधिकारी हजर न राहिल्याने पुढील तारिख देण्याची विनंती सरकारी पक्षातर्फे करण्यात आलेली आहे. दोन्ही बाजूच्या म्हणण्यानंतर न्यायालयाने शैलेंद्र याला पोलीस बोलावतील, त्यावेळी तपासासत हजर राहण्याचा अटींवर अंतरिम अटकपूर्व मंजुर केला.