पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये रुग्णसंख्या घटण्यास सुरूवात झाली आहे. तसेच अनेक रुग्ण घरीच उपचार घेणे पसंत करत आहेत. त्यामुळे शहरातील काही कोविड केअर सेंटर बंद करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ज़्या भागामध्ये रुग्णसंख्या कमी आहे त्या भागातील सेंटर बंद केले जाणार आहेत.
सद्यस्थितीत शहरामध्ये सहा हजारांहून अधिक रुग्ण महापालिका रुग्णालय कोविड केअर सेंटर व खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर अनेक रुग्ण घरीच राहून उपचार घेत आहेत. त्यामुळे अनेक कोविड केअर सेंटर रिकामे झाले आहेत. सेंटर रिकामे असल्याने त्यावर विनाकारण खर्च होत आहे. तसेच गेल्या चार दिवसांपासून शहरातील रुग्णसंख्या कमी होण्यास सुरूवात झाली आहे. तर झोपडपट्टी भागातील रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे महापालिका चालवत असलेले म्हाळुंगे येथील म्हाडा वसाहतीतील सेंटर, इंदिरा कॉलेज, डॉ. डी वाय पाटील, ईएसआय रुग्णालय चिंचवड, सिम्बॉयसिस किवळे हे पाच कोविड केयर सेंटर पहिल्या टप्यात बंद करण्यात येणार आहेत.
सद्यस्थितीत शहरातील झोपडपट्टी भागातील रुग्णसंख्या कमी झाली आहे. गृहनिर्माण सोसायटीमधील नागरिकांना करोनाची लागण होत आहे. त्यांना होम आयसोलेशन होण्यासाठी जागा उपलब्ध असल्याने ते घरीच राहून उपचार घेत आहेत. त्यामुळे कोविड सेंटरमधील रुग्णसंख्या कमी झाली असल्याने पहिल्या टप्यात पाच कोविड केअर सेंटर बंद केले जाणार आहे.
दहा हजार रुग्णांची सोय व्हावी, या हिशोबाने आपण नियोजन केले होते. मात्र सुदैवाने शहरात तशी परिस्थिती आता नाही. रुग्णसंख्या हळूहळू कमी होत आहे. बरेचसे नागरिक घरीच उपचार घेत आहेत. त्यामुळे काही कोविड केअर सेंटर बंद करण्यात येत आहेत. असे असले तरी अजूनही सर्वांनी काळजी घ्यायची आहे. मास्क व इतर नियमांचे पालन करायचे आहे.
– श्रावण हर्डीकर, आयुक्त, पिंपरी-चिंचवड मनपा