दुबई – आयपीएल स्पर्धेत आता आणखी एक रोमहर्षक मुकाबला रंगणार आहे. द्विशतकी धावांचा यशस्वी पाठलाग करणारा राजस्थान रॉयल्सचा संघ कोलकाता नाईट रायडर्स संघाशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाला आहे.
कर्णधार स्टिव्ह स्मिथ, संजू सॅमसन, राहुल तेवतिया, यशस्वी जयस्वाल, डेव्हिड मिलर, रॉबिन उथप्पा अशी तगडी फलंदाजी असल्याने कोलकाताचे गोलंदाज कशी कामगिरी करतात यावरच त्यांचे यशापयश अवलंबून आहे.
किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात अशक्य वाटणारा विजय राजस्थानने मिळवल्याने त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. त्यातच तेवतिया हा नवा तारा आयपीएलच्या क्षितीजावर उगवला असल्याने त्याच्यावर अंकुश कसा राखायचा हाच मोठा प्रश्न कोलकाताच्या गोलंदाजांसमोर निर्माण झाला आहे.
तसेच राजस्थानची गोलंदाजी देखील चांगली आहे. जोफ्रा आर्चर, जयदेव उनाडकट, टॉम कुरेन व फलंदाजीसह गोलंदाजीतही सरस कामगिरी करत असलेल्या तेवतिया यांच्यामुळे राजस्थानच्या गोलंदाजीला बळकटी आली आहे. यंदाच्या स्पर्धेत रविवारी राजस्थानने पंजाबच्या द्विशतकी धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केल्यामुळे त्यांच्यासमोर किती धावा पुरेशा होतील याबाबत कोलकाता संघासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राजस्थानने यंदाच्या स्पर्धेत आजवर झालेल्या सामन्यात दोन विजय मिळवले आहेत.
कोलकाताबाबत बोलायचे झाले तर त्यांच्या संघाला अद्याप एकच विजय मिळवता आला असून त्यातही त्यांना मधल्या फळीतील सरस फलंदाजाची उणिव प्रकर्षाने जाणवली आहे. त्यांनी सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत स्पर्धेतील पहिला विजय प्राप्त केला असला तरीही त्यांच्यासमोरचे प्रश्न काही कमी झालेले नाहीत.
शुभमन गील, नितीश राणा यांची फलंदाजी सरस झाली असली तरीही सुनील नरेन, कर्णधार दिनेश कार्तिक, इयान मॉर्गन व आंद्रे रसेल यांची फलंदाजी अद्याप संघासाठी लाभदायक ठरलेली नाही.
सॅमसन, तेवतियाला कसे रोखणार
प्रचंड भरात असलेल्या संजू सॅमसन व राहुल तेवतिया यांना रोखण्याचे आव्हान कोलकाता संघासमोर आहे. कोणत्याही खेळपट्टीवर व कोणत्याही गोलंदाजीवर अत्यंत आक्रमक फलंदाजी करण्याची क्षमता या दोन्ही फलंदाजांकडे आहे. त्यातही दुबईतील खेळपट्टीचा विचार करता प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने द्विशतकी धावसंख्या उभारली तरीही सामना सुरक्षीत आहे असे सांगता येणार नाही. त्यासाठी मधल्या षटकांत त्यांना अचुक व नियंत्रीत गोलंदाजी करावी लागणार आहे.