प्रांताधिकारी संजय तेली यांची माहिती ः तीन महिने होते धूळखात
आळंदी (पुणे) -आळंदी येथे गेली तीन महिन्यापासून करोनाच्या संसर्गजन्य महामारीमुळे त्रस्त झालेले अनेक रुग्ण उपचारांपासून दुरावलेल्यांना आळंदी येथे एमआयटी कॉलेजमध्ये गेल्या तीन महिन्यांपूर्वी 100 खाटांचे कोविड सेंटर शासनाच्या वतीने सुरू करण्यात आले होते; मात्र त्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात डॉक्टर्स नर्स व इतर आरोग्य कर्मचारी यांची कमतरता भासत होती त्यामुळे हे सेंटर गेली तीन महिने धूळखात पडून होते. आता हे कोविड सेंटर कार्यान्वित होणार आल्याची माहिती प्रांत अधिकारी संजय तेली यांनी दिली.
आळंदीत करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले असून येथील 2/3 खासगी कोविड सेंटर वगळले असता इतर बाधित रुग्णांना आळंदीपासून पुणे महानगरपालिका तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील शासकीय तसेच खासगी रुग्णालयात जावे लागत होते त्यामुळे करोना बाधित रुग्णांना आर्थिक भार अधिकचा सोसावा लागत होता.
आळंदी विकास युवा मंच यांचे वतीने आळंदी नगर पालिकेसह तहसील कार्यालय खेड तसेच प्रांताधिकारी खेड यांच्याकडे याविषयी वारंवार तक्रारी करून देखील हे सेंटर सुरू होत नव्हते. आज संदीप नाईकरे यांनी प्रांताधिकारी संजय तेली यांची प्रत्यक्ष भेट घेऊन परिस्थितीची त्यांना जाण करून दिली असता, अधिकारी संजय तेली यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून परिस्थिती लक्षात घेत येत्या दोन-तीन दिवसात कोविड सेंटर अत्याधुनिक सोयी सुविधांसह खुले करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.
यावेळी आळंदी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी अंकुश जाधव, राम खरात, संदीप नाईकरे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.