तळेगाव दाभाडे – आदिवासी विकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व आढावा घेण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी व तालुक्यातील आदिवासी बांधवांसमवेत सोमवारी (दि. 28) आमदार सुनील शेळके यांच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली
या बैठकीत आदिवासी समाजासाठी असणाऱ्या योजनांचे स्वरुप व अंमलबजावणी यावर विस्तृत चर्चा झाली. आदिवासी विकास विभागाच्या वतीने शासन स्तरावर अनेक योजना आहेत. परंतु काही योजनांची व्यवस्थित अंमलबजावणी होत नाही. तर काही योजनांसाठी लाभार्थ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. परंतु येणाऱ्या काळात मावळ तालुक्यात तळागाळापर्यंत योजना राबविल्या जातील. आदिवासी बांधवांना या योजनांचा लाभ घेता येईल. अनेक योजना आर्थिक विवंचनेतील आदिवासींना आधार देणाऱ्या ठरतील. सर्व अधिकाऱ्यांचेही यासाठी सहकार्य मिळणार आहे, असे आमदार शेळके यांनी यावेळी स्पष्ट केले.
शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळामार्फत आदिवासी बांधवांना आर्थिक स्वावलंबी करण्याच्या हेतू उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी कर्ज स्वरूपात बीज भांडवल देण्यात येते. तसेच महिलांच्या सबलीकरणासाठी आर्थिक मदत कर्जरुपात दिली जाते.
करोनामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या आदिवासींसाठी सरकारकडून खावटी अनुदान योजना नुकतीच सुरू करण्यात आली आहे. आदिवासी विकास महामंडळ आणि नाशिकच्या आदिवासी विकास आयुक्तांकडून प्रस्तावित खावटी अनुदान योजनेच्या अंमलबजावणीला मान्यता मिळाली आहे.
या वेळी घोडेगावचे उपप्रादेशिक व्यवस्थापक एस. एस. पिंगळे, जुन्नरचे सहाय्यक प्रादेशिक व्यवस्थापक आर.ओ.रॉय, जुन्नर येथील शबरी कार्यालयाचे प्रभारी शाखा व्यवस्थापक आर. बी. मगटराव, घोडेगावचे विपणन निरीक्षक एम. एम. दवणे, एस. के. वाणी व अन्य अधिकारी उपस्थित होते.
तसेच शंकरभाऊ बोऱ्हाडे, माजी सभापती शंकरराव सुपे, राष्ट्रवादी आदिवासी सेलचे अध्यक्ष राघुजी तळपे, नारायण काठे, किसन सुपे, सतूजी दगडे, नागोजी डोंगे, गबळु लांघी, नारायण चिमटे, ज्ञानेश्वर आढाळे, किरण हेमाडे, दिलीप बगाड, किरण हिले, लहु पोफळे, शंकर हेमाडे, बाबू वाजे, भाऊ मोरमारे माजी सरपंच, मारुती चिमटे, सखाराम केंद्रे, कैलास करवंदे व अन्य आदिवासी बांधव उपस्थित होते.