राजगुरुनगर -‘आपले कुटुंब आपली जबाबदारी’ या अभियानातंर्गत तालुक्यात होणाऱ्या सर्वेक्षणाची सुरूवात खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते राजगुरूनगर शहरात करण्यात आली. यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत आमदारांनी स्वतः घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केली.
खेड तालुक्यातील करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आज (दि 18) व उद्या शनिवारी 19 सप्टेंबर या दोन दिवसाच्या कालावधीत होत आहे. तालुक्यातील राजगुरुनगर, आळंदी आणि चाकण नगरपरिषद हद्दीसह उर्वरित गावांमध्ये संपुर्ण कुटुंबांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
आज आणि उद्या सर्व बॅंकाचे व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. यासह सर्व खासगी आस्थापना बंद आहेत. खेड तालुक्यात करोना बाधित व्यक्तींची संख्या पाच हजारापर्यंत पोहचली आहे. तालुक्यात मृतांची संख्या 125 झाली आहे.
करोनाची साखळी तोडण्यासाठी व बाधित व्यक्ती शोधून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ‘आपले कुटुंब आपली जबाबदारी’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याची सुरुवात आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते शहरातील नेहरू चौकात झाली.
यावेळी तहसीलदार सुचित्रा आमले, राजगुरूनगर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रकाश पाटील, प्रशासकीय अधिकारी युवराज विरणक, लेखा परीक्षण अधिकारी नरेंद्र कणसे, विकास वाघमारे, आरोग्य विभागाचे अधिकारी चारुबाला हरडे, तुकाराम पाटील, श्वेता बारहाते, अविनाश काळाने, प्रतीक्षा निकुंभे, सुनील निकाळजे आदी यावेळी उपस्थित होते.
या गावांमध्ये होणार घरटी तपासणी
ज्या गावांमध्ये जास्त करोना पॉझिटिव्ह आहेत त्या गावांमध्ये जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. या कालावधीत शहरातील सर्व कुंटुबातील लोकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी अडीचशे पथके नेमण्यात आली असून या आरोग्य पथकामार्फत नागरीकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.
तालुक्यातील तीन नगरपरिषदामध्ये व ग्रामीण भागात ज्या गावात 15पेक्षा जास्त करोना रुग्ण आहेत. अशा सर्व गावांची घरटी कुटुंब सदस्यांची तपासणी केली जाणार आहे. नागरिकांनी घरी राहून येणाऱ्या आरोग्य पथकाला सहकार्य करून तपासणी व माहिती द्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
2170 कुटुंबांत केवळ दोघे संशयित
राजगुरूनगर नगर परिषद हद्दीत ‘आपले कुटुंब आपली जबाबदारी’ या अभियानातंर्गत 9,269 कुटुंबापैकी 2170 कुटुंबांचे आज (दि. 18) सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी केवळ 2 व्यक्ती संशयित सापडल्या असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांनी सांगितली.