बॉलीवूडमधील प्रसिद्ध डायरेक्टर अनुभव सिन्हा यांचे “बंबई में का बा’ हे नवीन भोजपुरी गाणे रिलीज करण्यात आले आहे. या म्युझिक व्हिडीओमध्ये बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेता मनोज वाजपेयी झळकणार आहे. विशेष म्हणजे, “बंबई में का बा’ या गाण्याचे शूटिंग करोना काळात एका दिवसातच सिटी स्टुडियोमध्ये करण्यात आले होते. हे गाणे मनोज वाजपेयीने गायले असून त्यानेच परफॉर्म केला आहे.
मनोज वाजपेयी पहिल्यांदाच भोजपुरी अंदाजात रॅप करताना दिसला आहे. त्याचा हा अंदाज चाहत्यांना खूपच आवडला असून त्याच्या या व्हिडीओला आतापर्यंत एक लाखांहून अधिक जणांनी पाहिले आहे. हे गाणे शेअर करत मनोज वाजपेयीने ट्विट केले की, आपण सर्वांसमोर अत्यंत प्रेमाने हे गाणे सादर करत आहे.
“बंबई में का बा’ या गाण्यात हे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे की, मुंबई शहरात अशी कोणती खास गोष्ट आहे जी संपूर्ण देशातील लोकांना आकर्षित करते. दरम्यान, निर्माता आणि दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांना भोजपुरी संगीत खूप आवडते. त्यातच लॉकडाऊनच्या काळात त्यांनी वेळेचा सदुपयोग करत आपल्याच प्रोडक्शन बॅनरखाली या भोजपुरी म्युझिक व्हिडीओची निर्मिती करत दिग्दर्शन केले.