मुंबई – कंगना रणौत प्रकरण दिवसेंदिवस चिघळत चाललं आहे. काल मुंबई महापालिकेने तिच्या कार्यालयावर कारवाईचा बडगा उचलल्यानंतर कंगना अधिकच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. कंगना व शिवसेनेदरम्यान रंगलेल्या या वादात अनेक भाजप नेत्यांनी उडी घेतली असून महाराष्ट्र सरकारवर सडकून टीका केली आहे. अशातच आज भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रिपाईचे (अ) अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कंगनाच्या मुंबई येथील निवासस्थानी हजेरी लावली आहे.
यापूर्वी आठवले यांनी कंगनाचे मुंबईबाबतचे वक्तव्य चुकिचे असले तरी तिला मुंबईमध्ये येऊ देणार नाही ही भूमिका अयोग्य असल्याचे म्हंटले होते. तसेच कंगनाच्या सुरक्षेसाठी रिपाईचे कार्यकर्ते सज्ज असल्याचं सांगत तिला आपला पाठिंबा असल्याचंही दर्शवला होता.
दरम्यान, मुंबई महापालिकेने काल कंगनाच्या कार्यालयाचा काही भाग अनाधिकृत असल्याचं सांगत कारवाईचा बडगा उगारला होता. यानंतर शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेने ही कारवाई सूडबुद्धीने केल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली.
अशातच आता मंत्री रामदास आठवले कंगनाची भेट घेण्यासाठी तिच्या निवासस्थानी पोहचले असल्याने त्यांच्यादरम्यान काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Maharashtra: Union Minister Ramdas Athawale arrives at the residence of actor #KanganaRanaut, in Mumbai. pic.twitter.com/RuIGbNuUQP
— ANI (@ANI) September 10, 2020