पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांवरील ताणतणाव कमी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांना विपश्यनेचे ऑनलाइन धडे देण्याचा निर्णय घेतला आहे. यात सुमारे 10 हजारांहून अधिक शिक्षक सहभागी होणार असल्याची शक्यता आहे.
राज्यात गेल्या काही वर्षांपासून शिक्षकांना ध्यानधारणेचे धडे दिले जात आहेत. मात्र, करोना संकट तसेच लॉकडाऊनमुळे अनेक शिक्षक तसेच विद्यार्थ्यांमध्येही मानसिक ताण-तणाव निर्माण होत असल्याचे समोर आले आहे. अशावेळी शरीरासोबत मनाचीही प्रतिकारशक्ती वाढविणे गरजेचे आहे. यासाठी मनाचा व्यायाम म्हणजेच ध्यान केले पाहिजे.
याअनुषंगाने शिक्षण विभागाने ध्यानधारणेतील आनापान साधनेच्या माध्यमातून सकारात्मकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने ध्यान साधनेबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याची सुरूवात पुणे व नाशिक जिल्ह्यापासून केली जाणार आहे. दोन्ही जिल्ह्यातील सुमारे 10 हजार शिक्षक यामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.
राज्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन ध्यानधारणा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जात आहे. विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूटकडून शिक्षकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. सुमारे दीड तास हे प्रशिक्षण चालणार आहे. यामध्ये मानसोपचार तज्ज्ञ, आनापान साधनेचे महत्व सांगणारे डॉक्टरही मार्गदर्शन करणार आहेत.