पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांचे आवाहन
पुणे – पुणे शहराबरोबरच ग्रामीण भागातही करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यावर मात करण्यासाठी पूर्णपणे बरे झालेल्या प्रत्येक रुग्णांनी प्लाझ्मा (रक्तद्रव) दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी केले.
पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयात प्लाझ्मादाता गौरव कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त वीरेंद्र मिश्र, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, पोलीस उपायुक्त मितेश घट्टे आदी उपस्थित होते.
पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम म्हणाले, करोनाबाधित संख्या कमी करण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या http://puneplasma.in या वेबसाइटवर किंवा सहायक पोलीस निरीक्षक शिंत्रे मो.नं.9960530329 या व्हॉट्स ऍपवर मेसेजद्वारे प्लाझ्मा देऊ इच्छिणाऱ्यांनी नोंद करावी. पोलीस उपायुक्त मितेश घट्टे यांनी हे चांगले व्यासपीठ तयार केले आहे. बोलणारे भरपूर बोलतात; पण आपण सर्व प्लाझ्मादान करणाऱ्यांनी जे काही करून दाखविले याचा मला आनंद आहे. पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करणे गरजेचे आहे. ज्यांना ज्यांना प्लाझ्माची गरज आहे त्यांना ते देण्यासाठीच आपण हा उपक्रम राबवत आहोत. यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो, असेही ते म्हणाले.
यावेळी प्लाझ्मा दाते करण रणदिवे, मोहिम नलावडे, राहुल तुपे, वैभव लोढा, अजय मुनोत, राहुल लंगर, जमीर शेख, अवधूत दिवटे, वैभव भाकन, कुणाल तोडी, मोहित तोडी यांना पोलीस आयुक्तांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देऊन गौरवले.
पोलीस सह आयुक्त रवींद्र शिसवे म्हणाले, आपण सर्वांनी सगळ्या शंका-कुशंकांवर मात करून अनेकवेळा प्लाझ्मा दान केले आहे. तुमची ही कृती फार महत्त्वाची असून एखाद्याचा जीव वाचविणे हे एक मोठे काम आहे. तुमच्या मनात जागृत झालेली ही भावना अशीच पुढे चालू राहून समाजात एक मोठी चळवळ झाली पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
उपस्थितांचे सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील यांनी आभार मानले. यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी, कर्मचारी, प्लाझ्मा दाते व प्लाझ्मा स्वीकारलेल्या रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.