नगर (प्रतिनिधी) – नगरचा मोहरम देशात प्रसिद्ध आहे. करोनाच्या नियमांमुळे सवारी विसर्जन मिरवणुकीस पोलिसांनी बंदी घातली होती. या पार्श्वभूमीवर मुस्लीम बांधवांनीही सर्व नियमांचे पालन करीत विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आणि प्रशासनाला सहकार्य करत साधे पणाने मोरहम मिरवणूक साजरी करण्यात आली. करोनाच्या नियमांचे पालन करीत मुस्लीम बांधवांनी कोठला भागात मोहरमच्या सवाऱ्यांचे रविवारी जागेवरच विसर्जन केले. जागेवरच विसर्जन करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
कोठला येथील बारे इमाम (छोटे इमाम) आणि हवेली येथील बडे इमाम यांच्या सवाऱ्यांची स्थापना झाली. त्या जागेवरच मिरवणूक काढून जागेवरच विसर्जन करण्यात आले. दोन्ही ठिकाणी अतिशय शांतता आणि धार्मिक वातावरणात सवाऱ्यांचे विसर्जन करण्यात आले.
पोलीस दलाने कोठला आणि हवेलीकडे येणारे सर्व रस्ते बंद केले होते. पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या नेतृत्त्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. सवारी विसर्जनासाठी मोजक्याच भाविकांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रशासनातर्फे त्यांना पास देण्यात आले होते. कोठला परिसरात कोणालाही प्रवेश देण्यात आला नव्हता. करोनाच्या नियमांचे पालन करीत विसर्जन झाल्याने सर्वांनीच समाधान व्यक्त केले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.