स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत एमआयडीसी पोलिसांच्या दिले ताब्यात
नगर (प्रतिनिधी) – रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मालट्रकमधून मोबाईल, रोख रक्कम व कारची चावी चोरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नगरमध्ये अटक केली.
जावेद लियाकत शेख (वय- 30), अझरूद्दीन मेहबुब शेख (वय- 30 दोघे रा. मुकुंदनगर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पुढील तपासकामी त्यांना एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 22 ऑगस्ट रोजी रोमान चाहत खान (वय- 49 रा. हरियाणा) यांनी त्यांची मालट्रक विळद परिसरात नगर-मनमाड रस्त्यावर उभी केली होती. पहाटेच्या सुमारास दोघांनी त्यांच्या मालट्रकमध्ये शिरकाव करुन, मोबाईल, रोख रक्कम व कारची चावी चोरली होती. याप्रकरणी खान यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत असताना गुन्हा जावेद शेख याने केला असून तो कोठला परिसरात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. पोलीस हवालदार दत्ता गव्हाणे, मनोज गोसावी, पोलीस नाईक सचिन आडबल, रवीकिरण सोनटक्के, दीपक शिंदे, पोलीस शिपाई रणजित जाधव, शिवाजी ढाकणे यांच्या पथकाने जावेद शेख याला कोठला परिसरात अटक केली. त्याच्याकडून एक मोबाईल व दोन चाव्या हस्तगत केल्या. त्याच्याकडे गुन्ह्याबाबत विचारणा केली असता हा गुन्हा अझरूद्दीन शेख याच्या मदतीने केला असल्याची कबूली दिली.
पोलिसांनी अझरूद्दीनला मुकुंदनगर येथे अटक केली. पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील, पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.