करोनाबाधितांमध्ये झपाट्याने वाढ : तहसीलदारांनी जिल्हाधिकऱ्यांकडे अहवाल पाठवला
नारायणगाव- नारायणगाव ,वारूळवाडी (ता. जुन्नर) गावामध्ये गेल्या दोन आठवड्यात करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे दोन्ही गावांमध्ये कंन्टेमेंट झोन करून लॉकडाऊन करण्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी व जुन्नर-आंबेगाव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सोमवारी (दि. 24) पाठवण्यात आल्याची माहिती तहसीलदार हनमंत कोळेकर यांनी दिली.
करोनाबाधितांची संख्या वाढत अससल्याने तहसीलदार कोळेकर यांनी तातडीने नारायणगाव येथे आरोग्य विभाग, नारायणगाव व वारूळवाडी ग्रामपंचात, पोलीस विभाग यांची रविवारी (दि. 23) बैठक घेतली. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ, नारायणगावचे सरपंच योगेश पाटे, वारूळवाडीचे उपसरपंच सचिन वारुळे, तलाठी सोनवणे, काही गणपती मंडळाचे कार्यकर्ते होते.
प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत नारायणगाव व वारूळवाडी गावात 10 दिवसांत 80 रुग्ण आढळून आले आहेत. 3 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे करोनाबाधितांची साखळी तोडण्यासाठी लवकरच नारायणगाव व वारूळवाडी गावांमध्ये कॅंटेनन्मेंट झोन जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार लॉकडाऊन करण्याबाबतचा अहवाल वरिष्ठांना पाठविला आहे. तर गुरुवारी (दि. 27) किंवा शुक्रवारी (दि. 28) कंन्टेमेंट झोन होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांकडून येणाऱ्या आदेशावरून पुढील निर्णय घेण्यात येईल असे कोळेकर यांनी सांगितले .
- “श्रीं’चे विसर्जन बुधवारीच करा
जुन्नर तालुका प्रशासनाकडून कंन्टेंनमेंट झोन करण्याबाबतची कारवाई सुरु केली आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यनंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना बाहेर पडून विसर्जन करता येणे शक्य होणार नाही. तसेच लॉकडाऊनमध्ये विनाकारण घराबाहेर पडल्यास त्यांचेवर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे, त्यामुळे श्री गणरायांचे विसर्जन दि 26 पाचव्या दिवशी करावे असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी केले आहे.