नारायणगाव – जुन्नर शहरात घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यास पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी (दि. 22) कळंब (ता. आंबेगाव) येथे सापळा रचून जेरबंद केले आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
मंदार उर्फ सोमनाथ मदन रासने (वय – 31, रा. कासारआळी, सदाबाजार पेठ, जुन्नर) असे अटक करण्यात आलेल्या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे. जुन्नर येथील व्यावसायिक केदार जगदिश पुरवंत यांच्या घरात मंगळवारी (दि. 18) चोरी झाली होती. यात 45 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होती. त्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
या गुन्ह्यासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना शनिवारी त्यांना माहिती मिळाली की, जुन्नर शहरात घरफोडी करणारा आरोपी मंदार कळंब येथे येणार आहे. त्यानुसार पथकाने कळंब येथे सापळा रचून मंदारला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हाची कबूलली दिली. त्याला पुढील तपासासाठी जुन्नर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रवींद्र मांजरे, पोलीस नाईक दीपक साबळे, पोलीस हवालदार शंकर जम, सुनील जावळे, शरद बांबळे, पोलीस मित्र प्रसाद पिंगळे, राजु गायकवाड या पथकाने ही कारवाई केली.