चंदन तस्करीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे – चंदनाच्या झाडाची तस्करी करून विक्रीसाठी आलेल्या दोघांना ग्रामिण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. आरोपींच्या ताब्यातून मोबाईल, दुचाकी, रोकड, 22 किलो वजनाची चंदनाची लाकडे असा, 2 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रामदास शहाजी माने ( रा.मुर्टी, उंबरवाडा ता.बारामती), राजू बाबू शिंदे (,रा.दापोडी, वैदवाडी ता.दौंड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर चंदनाचा माल घेणारा आरोपी रमेश बाबू करडे (रा.दापोडी, ता.दौंड) हा हातातील चंदनाचे पोते तेथेच टाकून पळून गेला.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट आपल्या पथकासह शनिवारी यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर होते. त्यावेळी मौजे दापोडी, देशमुख वस्ती येथे दोघे जण रमेश करडे याला चंदनाची लाकडे विक्री करणेसाठी येणार असल्याची बातमी मिळाली होती. त्यानुसार महेश गायकवाड, निलेश कदम, सुभाष राऊत, गुरू गायकवाड यांचे पथकाने सापळा रचून दोघा आरोपींना ताब्यात घेतले तर करडे हा पळून गेला.पुढील कारवाईसाठी अटक केलेले दोघे आरोपी व मुद्देमाल यवत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून, आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.