- दिल्ली पोलिस आणि उत्तर प्रदेश एटीसची कारवाई
- पत्नी आणि मुलांकडे चौकशी, मोठा कट उघड
नवी दिल्ली – अटक केलेला इसिसचा हस्तक अबू युसूफ याच्या उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील घारातून पोलिसांनी आत्मघाती जाकीट आणि अनेक प्रकारची स्फोटके जप्त केली. त्याच्या घारातून इसिसचा झेंडा आणि या दहशतवादी संघटनेशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली. दिल्ली पोलिसांची विशेष शाखा आणि उत्तर प्रदेश एटीएस यांनी ही कारवाई केली.
दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी रात्री महंमद मुस्तकीम उर्फ अबू युसूफ याला दिल्लीतील धौलाकुआँ भागातून अटक केली होती. त्याच्याकडून दोन प्रेशर कुकर आणि 15 किलो स्फोटके आणि चार जिवंत काडतुसे असणारे पिस्तूल जप्त केले होते. त्याला अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेचे पथक आणि उत्तर प्रदेश एटीएसने त्याच्या बलरामपूर जिल्ह्यातील गावी त्याच्या घारावर छापा टाकला. पोलिसांनी घराची कसून तपासणी केली. त्याची पत्नी आणि मुलांकडे चौकशी केल्याचे समजते. याच गावातील दफनभूमीत त्याने छोट्या बॉम्बचा चाचणी केली असल्याचे तपासातून समोर येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्याच्या ताब्यातून जप्त केलेला बॉम्ब पूर्ण तयार होता. त्याचा केवळ टायमर सुरू करायचा होता. मात्र पोलिसांनी तो सुरक्षितपणे निकामी केला. एनएसजी कमांडोंनी दिल्लीत विविध ठिकाणी कोणता बॉम्ब ठेवले आहेत याची शोध मोहीम राबवली.
दिल्लीच्या विशेष शाखेचे उपायुक्त पी. एस. खुशवाह यांनी दिलेल्या माहितीनुसार मुस्तकीनला स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी बॉम्बस्फोट घडवायचा होता. त्याला एकट्यानेच हा कट पार पाडायचा होता. त्यासाठी त्याने अनेक ठिकाणी भेट दिली होती. मात्र कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे त्याला त्याच्या कटाची अंमलबजावणी करता आली नाही. आमच्या सूत्रांकडून आम्ही त्याच्या हालचालींवर नजर ठेवून होतो. तो इसिसच्या संपर्कात होता. आणि त्याच्या कमांडर्सशी त्याचा थेट संबंध असल्याचे तपासात आढळून आले आहे.
फिदायीन हल्ल्याची सूचना…
युसुफच्या घरातून दोन स्फोटकांची जॅकेट, एक स्फोटकांचा बेल्ट, नऊ किलो कच्ची स्फोटके, बॉल बेअरींग, सात सिंलिडरच्या आकाराचे बॉक्स, चार बॅटरी, इसिसचा झेंडा आणि नेमबाजी सरावासाठी लागणारा फलक जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेचे उपायुक्त प्रमोद खुशवाह यांनी दिली.
पादचाऱ्यांची संख्या अधिक असणाऱ्या ठिकाणी त्याला जप्त केलेले बॉम्ब ठेवायचे होते. मात्र त्याला त्याच्या अफगाणीस्तानमधील हॅंडलरकडून फिदायीन स्वरूपाचा हल्ला करण्याची सूचना देण्यात आली. असे खुशवाह यांनी सांगितले.