तुम्ही पोलीस पाटील झाल्यावर काय करणार आहात? असा प्रश्न मुलाखतीच्या वेळी उपविभागीय अधिकारी ज्योती कदम यांनी विचारला होता. तेव्हा “”मॅडम, संधी मिळाल्यास महाराष्ट्रातील सर्वोत्तम पोलीस पाटील होऊन दाखवेन”, असे उत्तर त्यांना दिले होते….
कुडजे गावचे पोलीस पाटील दत्ता पायगुडे आठवण सांगत होते, अन् त्याच वेळी आपण गावासाठी केलेल्या कामाचा सार्थ अभिमानही त्यांच्या चेहऱ्यावर होता. पायगुडे यांचे कुडजे गाव प्रसिद्ध. गावात प्रसिद्ध उद्योगपती बाबा कल्याणी, न्याती बिल्डर, मिरजचे राजे पटवर्धन तसेच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त रामराव वाघसाहेब, अशा दिग्गज मंडळींचे फार्महाऊस आहेत. मिरजचे राजे तसेच माजी पोलीस आयुक्त रामराव वाघसाहेब यांनी दत्ता पायगुडे यांच्या कामाचे कौतुक केले असून ते वेळोवेळी त्यांना मार्गदर्शनही करतात. पायगुडे यांनी आपल्या प्रेमळ स्वभावाने पुणे शहर पोलीस, पुणे ग्रामीण पोलीस, वनविभाग, महसूल विभाग तसेच जिल्हा प्रशासनाबरोबर आपले नाते घट्ट केले आहे.
पायगुडे यांनी आपल्या वहीमध्ये महाराष्ट्र पोलिसांची संपूर्ण माहिती लिहून ठेवली असून पुणे शहर पोलिसांची माहिती अक्षरशः तोंडपाठ केली आहे. तसेच करोनाच्या काळात गावाबरोबरच शहर, राज्य, देश तसेच संपूर्ण जगातील करोनाच्या अपडेट्स वहीमध्ये लिहिल्या आहेत आणि करोनाच्या संकटकाळात स्वखर्चातून गावातील शंभर गरीब कुटुंबांना धान्य, साखर, गूळ, डाळ, तसेच गावाशेजारील डोंगरातील वीस आदिवासी कुटुंबांना धान्य वाटप केले तसेच दहा परप्रांतीय कुटुंबांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी मदत केली. पायगुडे यांच्या कामाची दखल घेत त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यामुळे त्यांची संपूर्ण राज्यातून अर्थात महाराष्ट्रातून ग्रेट करोनायोद्धा म्हणून झालेली निवड.
कुडजे गावच्याकडेला खडकवासला धरण, सिंहगड किल्ला, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी तसेच मोठ-मोठे डोंगर आहेत. त्यामुळे गावाच्या सौंदर्यात भर पडली असून गावाला खूप महत्त्व आहे. मात्र आता करोना हे अभूतपूर्व संकट. उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या अखत्यारित वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर आणि त्यांचे सहकारी यांच्या मदतीने ते काम करतात. मात्र, आपल्या कार्यवैशिष्ट्यांमुळे आज त्यांनी सर्वदूर प्रसिद्धी आणि नाव कमावले. त्याचे कारण प्रशासनावर असलेले प्रेम आणि काम…चांगले काम करण्याची असलेली जिद्द यामुळेच.
वेळ मिळाल्यास छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तके, ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचण्यात तसेच लहान मुलांसाठी गोष्टी लिहिण्यात पायगुडे यांनी स्वतःचा विरंगुळा शोधला आहे. गेल्या वीस वर्षांपासून त्यांनी गावातील लहान मुलांना दरवर्षी खाऊ वाटप करणे तसेच चित्रकला स्पर्धा, किल्ले स्पर्धा, महिलादिन, बालदिन असे विविध कार्यक्रम घेऊन समाजाशी आपले नाते अगदी घट्ट केले आहे. आजही त्यांना पोलीस पाटील पदासाठी मिळणारे सर्व मानधन ते गावातील लहान मुलांसाठी आणि गरीब लोकांसाठी खर्च करतात.
पोलीस पाटील म्हणून काम करताना खूप जबाबदारीने वागावे लागते. रात्री अपरात्री कोणाचाही मदतीसाठी, किंवा गावात कधी काही तंटा झाल्याचा फोन आला तर अजिबात वेळ न डावलता पायगुडे लगेच स्वतः घटनास्थळी जाऊन योग्य ती मदत व मार्ग काढण्याचे प्रयत्न करीत असतात, त्यामुळे गावातील घटनांचे पोलीस चौकीपर्यंत जाण्याचे प्रमाण जवळपास 80 टक्के कमी झाले आहे व यात एक वेगळेच समाधान असल्याचे दत्तात्रय पायगुडे मानतात.
कुडजे गावची लोकसंख्या दोन ते अडीच हजार असून गावात महिलाराज आहे. सरपंचपदी अश्विनी अशोक पायगुडे तर उपसरपंचपदी प्राजक्ता अभिषेक लोणारे या दोघी हा पदभार सांभाळत आहेत. गावात राजकीय गटतट अजिबात नसून सर्व ग्रामस्थ एकीने राहतात, त्यामुळे गावात काम करणे सोपे व समाधानकारक असल्याचे मत पायगुडे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मा. शरद पवार साहेब तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार हे त्यांचे आवडते नेते. या नेत्यांच्या कामाचा आवाका आणी झपाटाही त्यांना स्तिमीत करतो. तसेच त्यांना एकदिवस भेटायची खूप इच्छा आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत असताना दहा हजारांपेक्षा जास्त पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. याची काळजी वाटते आहे. त्यामुळेच शासनाने पोलिसांच्या कामाच्या नियोजन व वेळेबाबतही काहीतरी केले पाहिजे, अशी त्यांची अपेक्षा. त्यामागच्या भावनेचे मोल खरेच अमूल्य असेच आहे.
गावचा लौकिक वाढवणारे आणि अटकेपार झेंडा फडकवणारे वीर सरदार मानाजी पायगुडे, कुस्तिपट्टू जाकार्तावीर कै. बुवासाहेब घुमे, फ्लाईंग ऑफिसर शहीद राजू पायगुडे तसेच चुलते गावचे माजी सरपंच भिकोबा पायगुडे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून दत्ता पायगुडे काम करत असतात.
तसेच ज्येष्ठ कीर्तनकार दिलीप महाराज पायगुडे, माजी सरपंच गजानन पायगुडे, माजी उपसरपंच माऊली पायगुडे, पिंटू पायगुडे आणि पोपट मांजरे ही मंडळी नेहमी त्यांना मार्गदर्शन करत असतात.
पोलीस पाटील म्हणून काम करत असताना मोठमोठे निर्णय घेण्यासाठी माजी सरपंच समीर पायगुडे युवानेते हर्षल पायगुडे आणी माजी सरपंच विश्वंभर मांजरे हे तीनही तरुण दत्ता पायगुडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असल्याचे दत्ता पायगुडे अत्यंत विनम्रपणे आणि आवर्जून सांगतात व त्यामुळेच त्यांना सिंघम स्टाईल काम करता येते, अशी टिप्पणीही करतात.