स्थानिक कारागिरांना आव्हान : ब्रॅण्डेड मास्कला मागणी
पिंपरी – करोना संसर्ग टाळण्याच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेतील पहिले साधन म्हणजे फेसमास्क असून, सार्वजनिक ठिकाणी फिरताना फेसमास्क नसेल तर दंडात्मक कारवाईसुद्धा सुरू झाली आहे. यामुळे प्रत्येकासाठी मास्क आता बंधनकारक झाला आहे.
प्रत्येकजण फेसमास्क विकत घेणारच याची जाणीव झाल्याने आता आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित कंपन्यांनी देखील मास्क बाजारात उतरविले आहेत. “ब्रांडप्रिय’ वर्गास डोळ्यासमोर ठेवत कंपन्यांनी आपली उत्पादने बाजारात आणली आहेत. यामुळे स्थानिक कारागिरांसमोर एक नवी प्रतिस्पर्धा निर्माण झाली आहे.
करोनाचा संसर्ग वाढल्याने प्रतिबंधात्मक उपाय शासनाने लागू केले आहेत. फेसमास्कचे महत्व अनेक पटींनी वाढले आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून तर फेसमास्क हा जीवनशैलीचा भाग बनला आहे. करोनामुळे नवीन कपड्यांची खरेदी कमालीची मंदावली असताना बड्या कंपन्या चिंतेत होत्या. त्याची चिंता फेसमास्क निर्मितीने काही प्रमाणात का होईना सोडविली आहे. ब्रॅंडेड फेसमास्कला लक्षणीय मागणी वाढत आहे.
ब्रॅंडेड कंपन्यांनी फेसमास्कचे नवी उत्पादने बाजारात आणली आहेत. एक, तीन व पाच संच अशा पद्धतीने विक्री सुरू आहे. बालक व महिला यांच्यासाठी वेगळ्या आकारातील मास्क बनवले आहेत. सामान्य फेसमास्कच्या तुलनेत याच्या किमती तिप्पट-चौपट आहेत. काहीशे रुपयांना त्या विकल्या जात असल्या तरी विशिष्ट ग्राहक वर्ग त्याची आवर्जून खरेदी करताना दिसत आहे.
सुरुवातीपासून स्थानिक पातळीवरील कपड्याचे पंधरा-वीस रुपयांपासून ते पन्नास रुपयांचे फेसमास्क वापरले जात होते. केवळ वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी यांच्याकडून “एन 95′ हा प्रमाणित फेसमास्क वापरला जात होता.
“ब्रॅण्डनेम’ स्टेट्स सिम्बॉल
या फेसमास्कवर ब्रॅण्डेड कंपनीचा लोगो असल्याने आपण इतरांपेक्षा वेगळा फेसमास्क वापरला आहे, हे अधोरेखित करण्यास मदत होते. शिवाय, फेसमास्क चेहऱ्याच्या मधोमध असल्याने लोगो चटकन पाहणाऱ्यांच्या नजरेत भरतो. ब्रॅंडेड फेसमास्कसुद्धा आता स्टेट्स सिम्बॉल बनला आहे.
पिंपरी-चिंचवडसारख्या शहरातही अनेक कंपन्यांचे ब्रॅंडेड फेसमास्क विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तीनशे रुपयांपासून अगदी एक हजार रुपयापर्यंत तीन फेसमास्कचा पॅक उपलब्ध आहे. या फेसमास्क खरेदीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. साधा मास्क वापरण्याऐवजी ब्रॅंडेड’फेसमास्क वापरण्याकडे तरुण पिढीचा कल वाढला आहे. त्याच्या वापरामुळे समाजात आपला स्तरही उंचावतो, असा त्यांचा समज आहे.