पिंपरी – महात्मा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत खासगी रुग्णालयांमध्ये करोनाबाधित रुग्णांसाठी किती बेड शिल्लक आहेत, याची माहिती रुग्णालयांबाहेर लावण्यात यावी. त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होईल, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश बाबर यांनी केली आहे.
त्यांनी याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांसाठी लागू असलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ रुग्णांना मिळायला हवा. मात्र, शहरातील काही खासगी रुग्णालये बेड फुल्ल असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे खरे काय आणि खोटे काय हे लक्षात येत नाही.
तरी, प्रत्येक रुग्णालयाबाहेर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत रुग्णालयामध्ये किती बेड आहेत, किती शिल्लक आहेत याची माहिती लावण्यात यावी. त्यामुळे नागरिकांची सोय होऊ शकेल. त्याशिवाय, शहरातील खासगी रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमण्यात आलेल्या विशेष पथकातील अधिकाऱ्यांचे नाव, संपर्क क्रमांक आणि ई-मेल आयडी नागरिकांच्या माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात यावा.