नकाशातील त्रुटी हवाईदलाने केल्या दूर; रखडलेली बांधकामे सुरू होणार
पुणे – शहरातील बांधकामांना परवानगी देताना त्याच्या उंचीबाबतचा पेच मिटला असून, आता रखडलेली बांधकामे पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतच्या नकाशातील त्रुटी हवाईदलाने दूर केल्याने हा प्रश्न मिटला आहे.
शहरातील बांधकामांना परवानगी देताना समुद्र सपाटीपासूनच्या उंची ठरवून देण्याबाबतचे नकाशे हवाई दलाने यापूर्वी पुणे महापालिकेला दिले होते. परंतु, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी असल्यामुळे शहरातील हजारो बांधकामे अडकून पडली होती. यातील त्रुटी दूर करण्याची विनंती पुणे महापालिकेने केली होती. ती मान्य करत हवाई दलाने नकाशातील त्रुटी दूर करून त्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे रखडलेली बांधकामे मंजूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
समुद्रसपाटीपासून जमिनीच्या उंचीबाबतचे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतला होता; परंतु त्याला लष्कराचे “ना हरकत प्रमाणपत्र’ घेणे बांधकाम व्यावसायिकांना बंधनकारक करण्यात आले होते. याला बांधकाम व्यावसायिकांनी विरोध केला. एखाद्या इमारतीला लष्कराने उंचीचे प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याच्या लगतच्या सर्वेनंबरमध्ये त्यापेक्षा कमी उंचीचे बांधकाम प्रस्ताव परवानगीसाठी दाखल झाल्यानंतर अशा प्रस्तावांना लष्कराच्या प्रमाणपत्राची सक्ती न करता महापालिकेने परवानगी द्यावी, अशी बांधकाम व्यावसायिकांची मागणी होती; परंतु विमानतळ आणि परिसरात कशा प्रकारे परवानगी द्यावी, यासंदर्भात हवाई दलाने महापालिकेला काही निर्बंध घातले होते. तसेच त्याबाबतचे कलर कोडिंग झोनचे नकाशे (सीसीझेडएम) ही महापालिकेस पाठवले होते.
हवाई दलाने महापालिकेला पाठवलेल्या “सीसीझेडएम’ नकाशांमध्ये अनेक त्रुटी असल्याचे महापालिकेने निदर्शनाला आणून दिले होते. त्यामुळे पुणे शहरातील शेकडो बांधकामे अडचणीत आली होती. त्यावर हवाई दल आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या दोन ते तीन वेळा एकत्रित बैठका झाल्या. या बैठकांमध्ये महापालिकेने “सीसीझेडएम’ नकाशांमध्ये झालेल्या चुका हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनाला आणून दिल्या होत्या.
…तर एनओसीची गरज नाही
यापूर्वी लष्कराकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. अशा सर्व्हे नंबरमध्ये अथवा त्या लगतच्या सर्व्हे नंबरमध्ये त्यापेक्षा कमी उंचीच्या बांधकाम करण्याचा प्रस्ताव दाखल केला, तर महापालिकेने अशा प्रस्तावांना लष्कराच्या ना हरकत प्रमाणपत्राची (एनओसी) मागण्याची गरज नाही. असे प्रस्ताव महापालिकेने स्वत:मान्य करावेत, अशी मागणी गेली अनेक वर्षे बांधकाम व्यावसायिक करत होते. त्यालाही हवाई दलाने मान्यता दिली आहे. त्यामुळे लष्कराच्या विमानतळाच्या आजूबाजूचे बांधकाम प्रस्ताव मंजूर करताना बांधकामांची उंची 592 मीटरच्या आत असेल, आणि एनडीएच्या आजूबाजूस 632 मीटरच्या आत उंची असेल तर त्यांना अशा बांधकाम प्रस्तावांना आता “एनओसी’ गरज लागणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.