शहरासह ग्रामीण भागात सातत्याने घट
पुणे – शहरासह जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येबरोबर मृतांचीही संख्या वाढत आहे. मात्र, त्यामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नसल्याचे मृत्यूदरात होत असणारी घट स्पष्ट करत आहे. एप्रिलमध्ये 5 टक्के असणारा मृत्यूदर जिल्ह्यात 2.34 टक्के घसरला आहे, असे सरकारी आकडेवारी सांगत आहे. मात्र, प्रत्यक्षात हे गुणोत्तर सिक्रय बाधित आणि मृत्यू असे असायला हवे. ते पाहता जिल्ह्याचा मृत्यूदर मेमध्ये 11.84 च होता. तो काहीसा कमी होत 6.89 टक्क्यांपर्यंत घसरल्याचे समोर आले आहे.
शहरात दि. 30 मार्च रोजी खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 52 वर्षीय व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाला. शहरातील हा पहिला बळी होता. त्यानंतर बाधितांची संख्या तसेच मृत्यूचे प्रमाणही वाढू लागले. यात वृद्ध आणि मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोगासह अन्य आजार असलेल्या व्यक्तींचा समावेश होता. जिल्ह्यात (पुणे आणि पिंपरी-चिंचवड, ग्रामीण, कॅन्टोन्मेंट आणि नगरपरिषद) पहिल्याच महिन्यात एप्रिल अखेरपर्यंत 86 जणांचा मृत्यूची नोंद झाली.
तर मेमध्ये जसजशी बाधित संख्या वाढू लागली, तशी मृत्यूची संख्या चौपट वाढली. मे अखेर जिल्ह्यातील मृत्यूची संख्या 331 वर पोहोचली. यावेळी सक्रिय बाधित आणि मृत्यूची संख्या यानुसार जिल्ह्यातील मृत्यूचा दर पाहिला तर 11.84 टक्के इतका आहे.
जिल्ह्यात आतापर्यंतची बाधित संख्या 94 हजार 978 वर पोहोचली असून, पुढील चार दिवसांत पुणे जिल्हा एक लाख बाधितांचा टप्पा पार करणार आहे. त्यामध्ये जुलैमध्ये सर्वाधिक 71 हजार 298 बाधित सापडले आहेत. तर आतापर्यंत 2 हजार 185 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात मृत्यूची संख्या वाढत असली तरीही मागील दोन महिन्यांतील मृत्यूदर पाहिला तर तो कमी होताना दिसत आहे. जूनमध्ये हा दर 9.62, जुलैमध्ये हे प्रमाण 6.89 टक्के असल्याचे समोर आले आहे.
कॅन्टोन्मेंट, नगरपरिषद हद्दीत मृत्यूदर अधिक
बाधित संख्येच्या तुलनेत जिल्ह्याचा मृत्यूदर काढला तर तो 2.30 टक्के इतका आहे. त्यामध्ये पुणे-2.43 टक्के, पिंपरी-चिंचवड-1.72, नगरपरिषदेचा 3.60, जिल्हा परिषद (ग्रामीण) – 2.45 तर कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत 3.90 टक्के मृत्यूदर असल्याचे दिसून येते. यामध्ये कॅन्टोन्मेंट आणि नगरपरिषद हद्दीत मृत्यूदर अधिक आहे.