नगर -किरण काळे यांच्या पुढाकारातून नगर शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने हाती घेण्यात आलेली “मिशन पॉझिटिव्ह सोच’ ही चळवळ कौतुकास्पद आहे. या माध्यमातून करोनाच्या बाबत समाजामध्ये सकारात्मकता निर्माण करण्याचे काम होत आहे. तसेच करोनापासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाय नागरिकांनी अवलंबवावेत असे, प्रतिपादन आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे.
शहर कॉंग्रेसच्या मिशन पॉझिटिव्ह सोच अभियानामध्ये तांबे सकाळच्या सत्रात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नगर शहरातील नागरिकांना संबोधित करत प्रतिबंधात्मक उपाय अवलंबवण्याचे आवाहन केले.
आ.तांबे म्हणाले की, करोनाच्या या संकट काळामध्ये नागरिकांनी धाडसी व्हायला पाहिजे. परंतु त्याचवेळी त्यांनी स्वतःची काळजी देखील घेतली पाहिजे.
करोना संसर्गामध्ये मृत्यूचे प्रमाण हे अत्यल्प असून, केवळ दोन टक्के एवढेच आहे. त्यामुळे त्याला घाबरण्याचे काही कारण नाही. मुळात वेळेत उपचार केल्यास महागड्या अशा वैद्यकीय उपचारांना देखील सामोरे जायची आवश्यकता भासत नाही. आपण जर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधला आणि उपचार घेतले तर अत्यल्प उपचारांमध्ये लोक करोनामधून बरे होत आहेत हे नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे.
करोनाच्या लक्षणांमध्ये केवळ सर्दी आणि ताप यांचाच समावेश आहे असे नाही. तर इतर लक्षणे देखील समोर आली आहेत. जुलाब, अती थकवा येणे, तोंडाची चव जाणे ही देखील करोनाची लक्षणे असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कपणे अशी काही लक्षणे आढळली तर तात्काळ आपल्या डॉक्टरांशी संपर्क करण्याचे आवाहन यावेळी आ.तांबे यांनी केले आहे.