वॉशिंग्टन – करोनामुळे आरोग्यविषयक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. आता अनेक देशांच्या नागरिकांना अज्ञात ठिकाणावरून गूढ बियाणे पाठवले जात असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे हे देश सावध झाले असून नागरिकांनी अशा बियाण्यांचा वापर न करता हे बियाणे चौकशी संस्थाकडे तत्काळ सुपूर्त करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
अमेरिका, कॅनडा, न्यूझीलंड याठिकाणी असे बियाणे अनेक नागरिकांना ई-कॉमर्सवरून आले आहे. ब्रिटनमध्ये तर शंभर नागरिकांना हे बियाणे आले आहे. प्रथमदर्शनी हे बियाणे चीनमधून विविध मार्गाने अमेरिकेत आले असल्याचे चौकशी करणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.
फ्लोरिडात 630 लोकांना असे बियाणे आले आहे. एका व्यक्तीला तर आठवड्यात तीन वेळा असे बियाणे आले. टेक्सासमध्ये एका महिलेने फारसा विचार न करता एप्रिलमध्ये आलेले बियाणे आपल्या बागेत लावले. मात्र, या बियाण्यातून काहीही आले नाही. अमेरिका आणि ब्रिटनमधील आयात-निर्यात विभाग हे बियाणे नेमके कुठून आले आणि कुठल्या देशांच्या मार्गाने आले याची चौकशी करीत आहेत. नागरिकांनी ऑर्डर दिली नसलेली वस्तू घेणे अयोग्य आहे आणि संशयास्पद वस्तू तर अजिबात घेऊ नये. सध्या करोनामुळे वातावरण खराब झाले आहे. अशा परिस्थितीत जैवयुद्धाचा धोका निर्माण होऊ शकतो, असे विविध देशातील सरकारनी आपल्या नागरिकांना बजावले आहे. काही पॅकेजवर चिनी अक्षरे दिसत आहेत.
अमेरिकेतील काही अधिकाऱ्यांनी सांगितले की, ई-कॉमर्स कंपन्यांना आपले पोर्टल अधिक व्यवहार करते असे भासवावे लागते. यासाठी अशा प्रकारची गरज नसलेली वस्तू खोट्या नावाने पाठविली जाते. त्याची बिले तयार केली जातात, असाही प्रकार असू शकतो.
चीनमधून बियाणे पाठविल्याचा इन्कार
अनेक बियाणे पॅकेजवर चिनी अक्षरे दिसतात. त्यामुळे अमेरिकेच्या कृषी विभागाने चीनकडे याबाबत विचारणा केली असता चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने या प्रकरणात चीनचा सहभाग असल्याचा इन्कार केला. चीनला बदनाम करण्यासाठी कुणीतरी असे करू शकते. त्यामुळे अमेरिकेने ही पार्सल चीनकडे पाठवावीत. आम्ही त्याची चौकशी करू, असे चिनी प्रवक्त्याने सांगितले.