जिनिव्हा – कोविड-19 ची साथ दीर्घ काळ सुरू राहण्याची शक्यता असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. या साथीमुळे अनेक देशांवर आर्थिक ताणही आला आहे.
उपचारांवरील खर्च आणि उपाय योजनांमुळे जगातील अनेक देशांवर मोठा ताण निर्माण झाला असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
जगभरात करोनाच्या साथीचा प्रादुर्भाव सुरू झाला, त्याला सहा महिने पूर्ण झाले. जागतिक आरोग्य संघटनेने करोनाच्या साथीची दखल घेऊन 30 जानेवारीला जागतिक आणीबाणीची घोषणा केली होती.
त्यानंतर या साथीच्या सध्याच्या स्थितीचा आढावा संघटनेच्या आपत्कालीन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर “डब्लूएचओ’ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात हा इशारा देण्यात आला आहे.
करोनाच्या साथीमुळे अनेक देशांना सामाजिक-आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागेल, असाही इशारा या निवेदनात दिला आहे. “डब्लूएचओ’ नं 30 जानेवारीला करोना ही जागतिक आरोग्य समस्या असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले, तेव्हापासूनची या समितीची ही चौथी बैठक होती.