एमएसएलटीएचे सचिव सुंदर अय्यर यांची माहिती
पुणे – करोनाचा धोका सध्या कायम असला तरीही येत्या काळात परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच शहरातील पारंपरिक स्पर्धांना तसेच वयोगट आणि वरिष्ठ स्पर्धांना येत्या सप्टेंबरपासून प्रारंभ होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे (एमएसएलटीए) सचिन सुंदर अय्यर यांनी दिली आहे.
संघटनेने सप्टेंबरपासून स्पर्धा, सराव तसेच अन्य गोष्टींना प्रारंभ करण्याचे निश्चित केले आहे. त्यापूर्वी सर्व परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. लहान मुलांच्या स्पर्धा इतक्यात सुरू करता येणार नाहीत. मात्र, वरिष्ठ गटाच्या तसेच व्यावसायिक स्पर्धा सुरू करण्यासाठी संघटनेची चर्चा सुरू असून दुसरीकडे स्पर्धांसाठी कोर्ट सज्ज करण्याची तयारीही जोर धरत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात काही लांबणीवर टाकण्यात आलेल्या स्पर्धांचे आयोजन करण्याचे निश्चित केले असून त्यानंतर संघटनेच्या दरवर्षीच्या वेळापत्रकानुसार स्पर्धांचे आयोजन केले जाईल, अशी माहितीही अय्यर यांनी दिली.
मार्चपासून करोनाचा धोका सुरू झाला तसेच देशात लॉकडाऊनही लावले गेले. त्यामुळे दरवर्षी मार्चपासून सुरू होत असलेल्या स्पर्धा लांबणीवर टाकाव्या लागल्या. आता अनलॉक सुरू झाले असून देशातील क्रीडांगणे तसेच क्रीडा संकुले खुली करण्याची परवानगीही सरकारने दिली असल्याने नियमांचे काटेकोर पालन करून वरिष्ठ गटाच्या खेळाडूंनी सरावाला सुरुवातही केली आहे. त्यासाठी संघटनेने काही नियम तयार केले असून त्यांचे पालन करणे खेळाडूंसाठी बंधनकारक आहे, असेही अय्यर यांनी सांगितले.
सराव करत असताना एका कोर्टवर केवळ दोन खेळाडू असतील. त्यांनी केवळ आपल्याच साहित्याला हाताळावे. दोन्ही खेळाडूंनी एंड बदलू नये. एकमेकांपासून किमान 6 फूट अंतर राखावे. दुहेरी गटात खेळत असलेल्या 4 खेळाडूंना एकावेळी सराव करता येईल. मात्र, त्यांनी संघटनेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असेल. तसेच खेळाडू, सपोर्ट स्टाफ व संघटनेचे सदस्य किंवा ज्या ठिकाणी सराव सुरू आहे तेथील कर्मचारी यांच्याशी संवाद साधताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे व मास्कचा वापर करावा, अशा स्पष्ट सूचना खेळाडूंना दिलेल्या आहेत.
60 वर्षे वा पुढील वयाच्या व्यक्ती तसेच 10 वर्षांखालील मुले यांना सरावासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. आपल्या साहित्याचे सातत्याने सॅनिटायझेशन करणे बंधनकारक आहे. कोणत्याही नियमांचे उल्लंघन करू नये, अशा स्वरूपाच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत, असेही अय्यर यांनी सांगितले.
कठोर अंमलबजावणी होईल
करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने खेळाडूंना सरावाला जरी परवानगी दिली गेली असली तरीही त्यासाठी तयार करण्यात आलेल्या नियमांची अत्यंत कठोर अंमलबजावणी केली जाईल. प्रत्येक खेळाडूने स्वतंत्र चेंडूचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग व मास्कच्या नियमांचे पालन महत्त्वाचे असेल. खेळाडू, कर्मचारी, सदस्य तसेच सरावाशी संबंधित व्यक्तींनाच केवळ कोर्टवर प्रवेश मिळेल, असेही अय्यर यांनी स्पष्ट केले.