सहा पराभवानंतर मार्ग सापडला
चेन्नई –भारताचा ग्रॅंडमास्टर बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याला विजयाचा मार्ग सापडला. लेजंड्स बुद्धिबळ स्पर्धेतील सलग सहा पराभवानंतर आनंदला सातव्या फेरीत विजय प्राप्त करण्यात यश आले.
कारकिर्दीत तब्बल पाच वेळा विजेतेपद मिळविणारा आनंद या स्पर्धेत सलग सहा सामन्यांत पराभूत झाला होता. त्याच्या कारकिर्दीवरही या सततच्या पराभवाने प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अखेर या स्पर्धेच्या सातव्या फेरीत त्याने इस्रायलच्या बोरिस गेलफंड याचा 2.5-0.5 असा पराभव केला.
या विजयासह आनंदने सहा गुणांनिशी आठव्या क्रमांकावर मजल मारली आहे. आता आठव्या फेरीत आनंदचा सामना चीनच्या डिंग लिरेनशी होणार आहे. लिरेन तीन गुणांसह 10व्या क्रमांकावर आहे. जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनने पीटर स्विडलरचा 2.5-1.5 असा सहज पराभव करत सर्वाधिक 20 गुणांनिशी अग्रस्थान भक्कम केले आहे.