सागर येवले
पुणे – शहरात प्रशासनाच्या आकडेवारीनुसार 305 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. तर सध्या करोनाबाधितांना 102 व्हेंटिलेटरचा वापर सुरू आहे. म्हणजेच, आणखी 203 व्हेंटिलेटर शिल्लक असतानाही अनेकांना व्हेंटिलेटसअभावी प्राण सोडावा लागत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे, पण मग बाकीचे व्हेंटिलेटर्स गेले कोठे, असा प्रश्न निर्माण होत आहे.
शहरात दररोज करोनाबाधितांची संख्या दीड ते दोन हजारांनी वाढत आहे. त्यामध्ये अत्यवस्थ बाधितांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे “कोणी व्हेंटिलेटर देता का व्हेंटिलेटर’ अशी आर्जव बाधितांचे नातेवाईक रुग्णालय आणि प्रशासनाकडे करत आहे. मात्र, “येथे व्हेंटिलेटर नाही, पेशंटला ससून किंवा नायडू रुग्णालयात जा’ असे खासगी रुग्णालये सांगत आहेत. त्यामुळे दिवसभर रुग्णालयाच्या पायऱ्या झिजवूनही व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे बाधिताचा प्राणजात आहे.
मागील दोन आठवड्यांत दररोज 25 ते 30 करोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद होत आहे. याआधी केवळ 8 ते 12 मृत्यू होत होते. दि. 19 जुलै रोजी सर्वाधिक 48 बाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामध्ये 24 तासांत 29 जणांनी जीव सोडला. यातील काही व्यक्तींना वेळेत व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले. मात्र, दोन दिवसांपूर्वी पुणे महापालिकेने दिलेल्या अहवालात शहरात 302 व्हेंटिलेटस उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. तर सध्या (दि. 24 जुलै) 663 बाधितांची प्रकृती चिंताजनक असून, त्यातील 102 जणांना व्हेंटिलेटर लावण्यात आले आहेत. मग, व्हेंटिलेटरअभावी तडफडणाऱ्या व्यक्तीला व्हेंटिलेटर का मिळत नाही, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
…तर 2,287 व्हेंटिलेटसची गरज
ऑगस्टमध्ये करोना बाधितांची संख्या दुप्पट ते तिप्पट वाढण्याची भीती आहे. त्यावेळी तब्बल 2 हजार 287 व्हेंटिलेटरची गरज भासेल. सध्या शहरात फक्त 305 व्हेंटिलेटस उपलब्ध आहेत. त्यामुळे आणखी 1,982 व्हेंटिलेटसची आवश्यकता भासणार असल्याचे प्रशासनाने आपल्या अहवालात म्हटले आहे.
खासगी रुग्णालयांची माहिती कितपत खरी
विभागीय आयुक्त कार्यालयाने सुरू केलेल्या डॅश बोर्डवर केवळ 4 व्हेंटिलेटर शिल्लक असल्याचे दर्शविण्यात आले आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयाकडून देण्यात येणारी माहिती नियमित खरी दिली जाते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.