पुणे : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर दहा दिवसाचे लॉकडाऊन केले आहे. दरम्यान, नियम मोडून हॉटेल सुरू ठेवणाऱ्या चालक आणि कुक वर कारवाई करून कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
हॉटेल चालक अनुज घनश्याम चौरसिया (वय ३४ रा. मंत्रा इरा सोसायटी, उंड्री) आणि त्याचा कूक नामे प्रकाश ताराचंद खत्री, (वय ३०, रा. भिंताड़े नगर, उंड्री) यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
कोंढवा परिसरात लॉकडाउन कालावधीत देखील एकाने हॉटेल सुरु ठेवले आहे अशी माहिती गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांना मिळाली होती. गुन्हे शाखा यूनिट ५ मधील अधिकारी व कर्मचारी यांनी हॉटेल नाईट क्रेवेर्स येथे जाऊन पाहणी केली असता तेथे हॉटेल सुरु असल्याचे दिसून आले. पथकाने हॉटेल चालक आणि कुक याला ताब्यात घेतले.
पुढील कारवाईसाठी दोघाना कोंढवा पोलीस ठाण्यात पाठवून दिले आहे. तसेच त्यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात भादवि क. १८८,राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे क. ५१(ब), महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना २०२० चे नियम ११, संसर्गजन्य कायदा १८९७ चे कलम ३ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.