विश्वकरंडक 2019 मधील घटनेचा पुस्तकात उल्लेख
लंडन – इंग्लंडमध्ये गेल्या वर्षी झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेतील सुपरओव्हर पूर्वी ड्रेसिंगरूममध्ये परतल्यावर इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स याने चक्क धूम्रपान केल्याचा उल्लेख एका पुस्तकात करण्यात आला आहे. क्रिकेटच्या पंढरीत म्हणजेच लॉर्डस मैदानावर घडलेल्या या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खळबळ उडाली असून आयसीसीच्या कार्यक्षमतेवरच शंका घेण्यात येत आहे.
या स्पर्धेचा अंतिम सामना स्टोक्सच्या फलंदाजीमुळेच बरोबरीत सुटला होता. सामन्याचा निकाल मिळविण्यासाठी सुपरओव्हरचा अवलंब करण्यात आला होता. 1975 सालापासून सुरू झालेल्या विश्वकरंडक स्पर्धांच्या इतिहासात प्रथमच इंग्लंडला विजेतेपद मिळविण्याची संधी होती.
त्यावेळी सामना बरोबरीत आल्याने स्टोक्ससह सर्वच खेळाडू तणावाखाली होते. जेव्हा सुपरओव्हर जाहीर झाली त्यापूर्वी 10 मिनिटे दोन्ही संघांचे खेळाडू ड्रेसिंगरूममध्ये गेले होते. त्यावेळी तणावातून बाहेर येण्यासाठी स्टोक्सने धूम्रपान केल्याचा उल्लेख मॉर्गन्स मेन – द इनसाइड स्टोरी ऑफ इंग्लंड्स राइज फ्रॉम क्रिकेट वर्ल्ड कप ह्युमिलेशन टू ग्लोरी या निक हौल्ट आणि स्टिव्ह जेम्स यांनी लिहिलेल्या पुस्तकात करण्यात आला आहे.
मैदानावर जवळपास 30 कॅमेरे असतात तसेच अधिकारी व कर्मचारीवर्ग असतो. मात्र, स्टोक्स या मैदानावर अनेकदा खेळलेला असल्याने त्याला येथील सर्व जागांची माहिती आहे. त्यामुळे सिगारेट ओढण्यासाठी त्याने अशीच जागा निवडली होती.
या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 241 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने स्टोक्सच्या खेळीने बरोबरी करण्यात यश मिळवले. त्यावेळी निकाल हाती येण्यासाठी सुपरओव्हर खेळविण्यात आली. त्यातही दोन्ही संघांनी 15 धावा केल्याने ही ओवरही बरोबरीत सुटली व आयसीसीच्या अनाकलनीय नियमांमुळे इंग्लंडने विजेतेपद मिळवले. दोन्ही संघात सर्वाधिक षटकार ज्या संघाने फटकावले त्याला विजेता घोषित करण्याचा हा निर्णय त्यावेळी तसेच अद्यापही वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे.
स्टोक्सचे मौन आश्चर्यकारक
या पुस्तकात केलेल्या उल्लेखावर खुद्द बेन स्टोक्सने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. जर स्टोक्सने ही घटना नाकारली तर हा विषय संपेल मात्र, जर त्याने याची पुष्टी केली तर मात्र, आयसीसी काय भूमिका घेईल ते आता महत्त्वाचे ठरणार आहे.