नवी दिल्ली – चीनबरोबरच्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर भारताने आपली टेहळणी क्षमता अधिक विकसित करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी इस्रायलकडून हेरॉन सर्व्हिलन्स ड्रोन आणि रणगाडाभेदी स्पाईक क्षेपणास्त्रे घेण्याचे ठरवले आहे. लष्कराला प्राप्त झालेल्या आपत्कालीन वित्तीय अधिकारांतर्गत ही खरेदी केली जाणार आहे.
हेरॉन टेहळणी ड्रोन भारतीय लष्कर, वायूदल आणि नौदलाकडे पूर्वीपासूनच आहे. लडाखमधील तणावाच्या प्रसंगी लष्कराकडून त्याचा टेहळणीसाठी आणि लक्ष्य निश्चित ओळखण्यासाठी सर्रास वापरदेखील केला गेला होता. मात्र, हवाई दलाच्या क्षमता वाढवण्यासाठी सद्यस्थितीतील ड्रोनच्या उपयुक्ततेला अधिक प्रमाणात उपयोगी आणले जाणे अपेक्षित आहे, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. मात्र, इस्रायलकडून नक्की किती ड्रोन खरेदी करावयाचे ठरवले आहे, हे निश्चितपणे समजू शकलेले नाही. हेरॉन ड्रोन सलग दोन दिवस अवकाशात उडू शकतात आणि समुद्रसपाटीपासून 10 किलोमीटरपर्यंतची उंची गाठू शकतात.
दुसरीकडे रणगाडाभेदी स्पाईक क्षेपणास्त्रांची ऑर्डरदेखील देण्याचे ठरवले गेले आहे. बालाकोटच्या एअर स्ट्राईकनंतरही भारताने इस्रायलकडून हीच क्षेपणास्त्रे मागवली होती. गेल्यावेळी लष्कराने 12 लॉंचर आणि 200 क्षेपणास्त्रे मागवली होती. मात्र, आता शत्रूच्या कोणत्याही चिलखती वाहनापासून संभाव्य धोक्याचा मुकाबला करण्यासाठी अधिक संख्येने ही क्षेपणास्त्रे मागवली जाणार आहेत.
याचदरम्यान “डीआरडीओ’कडून मानवाकडून लॉंच केली जाऊ शकणाऱ्या रणगाडाभेदी क्षेपणास्त्रांचा विकास केला जात आहे. या देशांतर्गत बनावटीच्या क्षेपणास्त्रांचे 50 हजार इतक्या व्यापक संख्येने उत्पादन केले जाण्याची शक्यता आहे.
याशिवाय 200 स्पाईस बॉम्ब, ऍसॉल्ट रायफली आणि काही विशिष्ट श्रेणीच्या स्फोटकांची लष्कराकडून होत असलेली मागणीही लवकर पूर्ण केली जाण्याची शक्यता आहे.