वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलिकडेच जे व्हिसा धोरण जाहीर केले आहे त्याला विरोध दर्शवत अमेरिकेतल्या 17 राज्यांतल्या सरकारांनी या निर्णयाला कोर्टात आव्हान दिले आहे. ट्रम्प प्रशासनाचा हा निर्णय क्रुर, घाईगडबडीने घेण्यात आलेला आणि बेकायदेशीर आहे.
अमेरिकेत विद्यार्थी व्हिसावर जे विद्यार्थी आले आहेत आणि ज्यांचे अभ्यासक्रम सध्या ऑन लाईन पद्धतीने सुरू आहेत त्यांनी अमेरिकेत राहण्याची गरज नाही असे नमूद करीत ट्रम्प प्रशासनाने त्यांना देशाबाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांचा हा निर्णय क्रुरपणाचा आहे असेही या सरकारांनी म्हटले आहे.
मॅस्युच्युसेट्स जिल्हा न्यायालयात या निर्णयाच्या विरोधात आव्हान याचिका दाखल करण्यात आल्या असून या निर्णयांची अंमलबजावणी थांबवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. 17 राज्यांच्या वकिलांनी एकत्रितपणे या याचिका सादर केल्या आहेत. ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाचा भारतीय विद्यार्थ्यांना मोठा फटका बसणार आहे.
जानेवारी महिन्यासाठी एकूण 1 लाख 94 हजार 556 भारतीय विद्यार्थ्यांनी अमेरिकेतील विविध शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतला आहे. ज्या राज्यांनी सरकारच्या या निर्णयाला आव्हान दिले आहे, त्या राज्यांमध्ये कोलोराडो, मेरीलॅंड, मिचीगन, मिन्नेसोटा, नेवाडा, न्यूजर्सी, न्यू मेक्सिको, ओरेगॉन, पेन्सीलव्हॅनिया, ऱ्होड आयलंड, व्हर्जिनिया, व्हिस्कोनसिन या राज्यांचा समावेश आहे.
या राज्यांमध्ये विदेशातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी येत असतात. विदेशी विद्यार्थ्यांमुळे आमच्या राज्यातील अर्थव्यवस्थेलाही मोठ्या प्रमाणात लाभ होत असतो असे त्यांनी म्हटले आहे.