कराड (प्रतिनिधी) – राज्यातील केंद्राकडे प्रलंबित असणाऱ्या कामगारांच्या प्रश्नासंदर्भात खा. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पुणे येथे बैठक पार पडली. यावेळी कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे उपस्थित होते.
या बैठकीत ना. छगन भुजबळ यांना राज्यातील शासकीय गोदामातील हमालांच्या प्रश्नांबाबतचे निवेदन सादर केले. यात निवेदनात राज्यातील शासकीय गोदामातील हमालांना अन्यायकारक अशी कंत्राटी पद्धत बंद करण्यात यावी, हमालांना स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, विश्रांतीगृह यासारख्या किमान नागरी सुविधा मिळाव्यात, अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकेचा लाभ मिळावा, अशा विविध मागण्यांचा समावेश आहे.
तर राज्यातील अनेक भागात हमाल तोलाईदारांना काम नाकारणे, व त्यांची मजुरी आणि लेव्ही माथाडी मंडळात जमा करण्यास नकार देणे आदी प्रकार सुरू असल्याकडे महामंडळाच्या प्रतिनिधींनी आपल्या अडचणी मांडत खा. शरद पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, ना. दिलीप वळसे- पाटील, ना. छगन भुजबळ यांचे लक्ष वेधले.