नवी दिल्ली – कोविड-19 ची चाचणी आणि त्वरित निदान करणे यांच्यामध्ये समन्वय साधून पावले उचलली जात असल्यामुळे रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोविड-19 चे एकूण 19,235 रूग्ण बरे झाले. याचा परिणाम म्हणजे कोविड-19 च्या बरे झालेल्या रूग्णांच्या एकत्रित आकडेवारीमध्ये वाढ झाली आहे.
देशामध्ये आत्तापर्यंत बरे झालेल्या रूग्णांची संख्या आज 5,34,620 झाली आहे. रूग्ण बरे होण्याची टक्केवारी आता 62.93 झाली आहे. कोविडचे रूग्ण बरे व्हावेत, यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या सक्रिय रूग्णांपेक्षा 2,42,362 ने जास्त आहे. तर करोनामुळे आजारी असलेल्या 2,92,258 सक्रिय रूग्णांना सर्वतोपरी वैद्यकीय सेवा दिली जात आहे.
कोविडबाधित व्यक्तींना वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी कोविड समर्पित आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एकूण 1370 कोविड समर्पित रूग्णालये (डीसीएच), 3062 कोविड समर्पित आरोग्य केंद्रे (डीसीएचसी) आणि 10334 कोविड दक्षता केंद्र (सीसीसी) यांचा समावेश आहे.
सर्व राज्यांमध्ये नेमक्या किती चाचणी केल्या जातात, यांच्या आकडेवारीत नियमित वाढ होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 2,80,151 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. आत्तापर्यंत देशात झालेल्या चाचण्यांचा एकत्रित आकडा पाहिला तर देशात 1,15,87,153 चाचण्या झाल्याचे स्पष्ट होत आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजेच भारतामध्ये प्रति दक्षलक्ष 8396.4 या प्रमाणात जनतेच्या कोविड-19 चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
संपूर्ण देशामध्ये तपासणी आणि निदान प्रयोगशाळांचे जाळे विस्तारित करण्यात आले आहे. त्यामुळे आता सरकारी क्षेत्रामध्ये 850 प्रयोगशाळा आणि खासगी क्षेत्रातल्या 344 प्रयोगशाळा म्हणजेच दोन्ही मिळून 1194 प्रयोगशाळांमधून कोविड-19 ची चाचणी, परीक्षण केले जात आहे.