नवी दिल्ली – जगभरातील संशोधक सध्या कोरोना विषाणूवर प्रभावी ठरेल असं औषध शोधण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. मात्र संशोधकांच्या या अथक प्रयत्नांना अद्याप यश आलेलं नाही. अशातच काही दिवसांपूर्वी रामदेव बाबा यांनी आपण पतंजलीच्या माध्यमातून कोरोनावरील आयुर्वेदिक औषध शोधून काढल्याचा दावा केला होता. यानंतर रामदेव बाबा यांनी एका जाहीर कार्यक्रमाद्वारे ‘कोरोनील’ औषध सादर करत अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतले.
रामदेव बाबा यांनी कोरोनील औषध सादर केल्याच्या काही तासातच सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे या औषधाच्या चाचण्या पूर्ण होईपर्यंत जाहिरातीवर बंदी घालण्यात आली. यानंतर उत्तराखंड आयुष मंत्रालयात काम करणाऱ्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने, ‘पतंजलीतर्फे या औषधाची परवानगी घेताना कोरोनाचा साधा उल्लेखही केला नाही.’ असा खुलासा केल्याने या औषधाभोवती संशयाचे ढग अधिकच गडद झाले होते.
अशातच आज या प्रकरणात आणखी एक महत्वपूर्ण घडामोड घडली आहे. एका नामांकित हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार खुद्द पतंजलीने आपण कोरोनावर औषध बनवलं नसल्याचं स्पष्ट केलंय. याबाबत सविस्तर माहिती अशी की, उत्तराखंड आयुष मंत्रालयातर्फे पतंजलीला कोरोना औषधाबाबत स्पष्टीकरण मागणारी एक नोटीस बजावण्यात आली होती. याला उत्तर देताना पतंजलीतर्फे आपण कोरोनावर औषध बनवलं नाही असं स्पष्टीकरण देत आपल्या पूर्वीच्या दाव्यावरून कोलांटउडी मारली आहे.