ग्रामस्थ भयभीत : नीरावागजमध्ये शेळी, बोकडावर हल्ला
बारामती (प्रतिनिधी) – नीरावागज (ता. बारामती) येथील पन्हाळे वस्तीवरील शेतकऱ्याच्या शेळी व बोकडावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना रविवारी (दि 28) रात्री घडली आहे. निरावागज परिसरात बिबट्याचा वावर असून गाव व वाड्या-वस्त्यांवर बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.
पन्हाळे वस्ती येथील सोमनाथ पन्हाळे या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. तर याबाबात खबर मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक मदन देवकाते, पोलीस पाटील अमित देवकाते, सरपंच यशवंत देवकाते, सरपंच यशवंत देवकाते, बाबू कारंडे, तुषार देवकाते, सुनील देवकात, वन विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ, आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी सोमनाथ पन्हाळे त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. ग्रामस्थांच्या मागणीनुसार नीरावागज परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे व पिंजरा बसविण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सध्या खरिपाचा हंगामामुळे शेतीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. अशा परिस्थितीमध्ये बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांना शेतात जाणे कठीण झाले आहे. नीरावागज परिसरातील बिबट्या लवकरात लवकर जेरबंद होणे गरजेचे आहे.
– अमित देवकाते, पोलीस पाटील, नीरावागज
दरम्यान, काटेवाडी येथे यापूर्वी बिबट्याने धुमाकूळ घातला होता. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे व पिंजऱ्याच्या साह्याने तीन बिबटे जेरबंद केले. त्यानंतर काटेवाडीकरांना दिलासा मिळाला होता. असे असले तरी नीरावागज परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आला असून यापूर्वी देखील नीरावागज परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आले होते.