पिंपरी – महापालिका प्रशासनाने वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड आरक्षित करावेत. जुलै, ऑगस्ट महिन्यात देखील करोना बाधित रुग्णांची संख्या वाढणार असल्याचा महापालिका आरोग्य विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे वाढत्या करोना बाधितांसाठी महापालिकेच्या रुग्णालयामध्ये एवढ्या खाटा उपलब्ध होणार नाहीत. त्यासाठी खाजगी रुग्णालयातील खाटा आरक्षित करणे गरजेचे आहे, असे मत विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी व्यक्त केले आहे.
काटे यांनी यांनी याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरामध्ये करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शहरात आज अखेर 2262 करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. सध्या 896 करोनाबाधितांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार चालू आहेत. रोज शंभरच्या पटीत करोनाबाधित सापडत आहेत. त्यामुळे शहरात करोनाग्रस्तांची स्थिती गंभीर झालेली आहे.
शहरातील वाढत्या करोना बाधितांना वेळेत योग्य उपचार होण्यासाठी बेड, ऑक्सिजन, अतिदक्षता विभाग आणि प्रसंगी व्हेंटीलेटरची सोय उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या निर्देशानुसार शहरातील खासगी रुग्णालय संचालकांसमवेत बैठक घेण्यात यावी. खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड आरक्षित करण्यात यावेत. त्यामुळे जुलै- ऑगस्ट महिन्यात करोनाचे रुग्ण वाढले तरी त्यांची गैरसोय होणार नाही. तसेच, त्यांना वेळेत योग्य ते वैद्यकीय उपचार मिळतील.