कादवेमधील महिलेला करोनाची लागण
वेल्हे (प्रतिनिधी)-पानशेत परिसरात करोनाचा पुन्हा शिरकाव झाला आहे.वेल्हे तालुक्यातील पहिला करोना रूग्ण हा पानशेत परिसरात आढळून आला होता. वेल्हे आरोग्य विभागाकडून प्रत्येक गावामध्ये नागरिकांचे सर्वेक्षण चालू असताना कादवे येथील एका 42 वर्षीय महिलेला करोनाची बाधा झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अंबादास देवकर यांनी दिली.
वेल्हे आरोग्य विभागाकडून गावांमध्ये नागरिकांचे सर्वेक्षण चालू असताना संबंधित महिलेला करोनाची लक्षणे आढळून आली. तिची तपासणी केली असता करोनाची लागण असल्याचे निष्पन्न झाले. या महिलेच्या घरी भोसरी येथील नातेवाइकांचा काही दिवस मुक्काम होता. या महिलेच्या संपर्कातील 14 जणांचे स्वॅब (घशातील द्रव) तालुक्यातील केअरमध्ये घेऊन तपासणीसाठी पुढे पाठविण्यात आले आहे.
पानशेत परिसरातील निगडे मोसे येथील बाळंत महिलेला 8 जुन रोजी झाला होता.त्या बाळंत महिलेने करोनावर मात केली. सध्या वेल्हे तालुक्यात करोना रूग्णसंख्या 34 झाली असून त्यापैकी 32 जणांनी करोनावर मात केली आहे. तर 2 रूगणांवर उपचार सुरू आहेत. तालुक्यातील वडगाव झांजे येथील रहिवासी असलेल्या एका करोनाबाधिताचा मृत्यू झाला असून त्याची नोंद पुणे शहरात झाली आहे.