भूमी अभिलेख विभागाने राज्याकडे पाठविला प्रस्ताव
पुणे – भूमी अभिलेख विभागाने गृहप्रकल्पातील प्रत्येक सदनिकाधारकाला महत्त्वाचा पुरावा असलेला प्रॉपर्टी कार्ड देण्यासंदर्भात प्रस्ताव राज्य शासनाकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविला आहे. या प्रस्तावास लवकर मान्यता मिळणार असल्याचा विश्वास भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
सदनिकांच्या बाबतीत मालकी हक्क सिध्द करण्यासाठी महापालिकेकडे कर भरल्याची पावती आणि खरेदी-विक्री करारनामा एवढाचा दस्त उपलब्ध असतो. ज्या जागेवर इमारत उभारली आहे. त्या जागेच्या प्रॉपर्टी कार्डवर मात्र गृहनिर्माण सोसायटी अथवा अपार्टमेंट नोंद असते. तसेच सर्व सदनिकाधारकांची एकत्रित नावे त्यावर असतात. त्यामुळे एका व्यक्तीने कर्ज घेतले तरी प्रॉपर्टी कार्डवर इतर हक्कामध्ये याचा उल्लेख असतो. त्यामुळे हा बोजा प्रॉपटी कार्ड नोंदविण्यात येतो. याच्या अनेक तक्रारी दाखल आहेत. प्रॉपटी कार्डवर हा बोजा नोंदविण्यात येत असल्याने काही वेळेस त्याचा त्रास अन्य सदस्यांनाही सहन करावा लागतो. या सर्व पार्श्वभूमीवर व्हर्टीकल इमारतींना प्रॉपर्टीकार्ड देण्याचा प्रस्ताव भूमि अभिलेख विभागाकडून तयार करण्यात होता.
मुख्य प्रॉपर्टी व्यतिरिक्त प्रत्येक सदनिका धारकास पुरवणी प्रॉपर्टी कार्ड देण्याची शिफारस त्यामध्ये करण्यात आली आहे. तसा प्रस्ताव राज्य सरकाकरडे मंजुरीसाठी पाठविला होता. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावास राज्य सरकारकडून मध्यंतरी मान्यता देण्यात आली. त्यानंतर राज्य सरकारकडून या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली होती. त्यावर नागरिकांकडून हरकती सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्या हरकतींवर सुनावणी घेऊन अंतिम नियमावली तयार करून तसा प्रस्ताव मार्च 2020 मध्ये राज्य शासनाकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.
या नियमावलीत प्रत्येक सदनिकाधारकांना पुरवणी प्रॉपर्टीकार्ड देण्यासाठी काही शुल्क अकरावे, अशी तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबरच पुरवणी प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी दस्तनोंदणी, महापालिकेने मान्यता दिलेले बांधकाम नकाशे, काम सुरू करण्याचा दाखला, भोगवटा पत्र, पूर्णत्वाचा दाखला, एनए ऑर्डर आदी कागदपत्रे, कन्व्हेनंन्स डिड करण्यात आलेल्याची कागदपत्रे अर्जासोबत जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. सोसायटी अथवा ऍपार्टमेंटमधील रहिवासी एकत्रितरीत्या अर्ज करण्याची किंवा सदनिकाधारकांना वैयक्तिकरीत्या अर्ज करण्याची देखील या नियमावलीत तरतूद करण्यात आली असल्याचे भूमि अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
फसवणूक टळणार…
एखाद्या सोसायटीतील ज्या सदनिकाधारकाने सदनिका तारण ठेवली असेल अथवा त्यावर कर्ज घेतले असेल त्याची नोंद पुरवणी प्रॉपर्टी कार्डवर घेतली जाणार आहे. प्रत्येक सदनिकांचे प्रॉपर्टी कार्ड वेगळे मिळणार असल्याने कोणत्या सदनिकेवर कर्ज आहे, याचा मालक कोण, यापूर्वीचे मालक, त्यांचे नेमके क्षेत्रफळ, अन्य स्वरूपात बोजा असेल, तर अशा सर्वांची नोंद त्यावर होणार आहे. यामुळे खरेदीदारांची फसवणूक टळण्यास मदत होणार आहे.