नवी दिल्ली- सरकारी रुग्णालयातील स्थिती उघड करण्यासाठी व्हिडिओ चित्रीकरण करणाऱ्या डॉक्टरला सर्वोच्च न्यायालयाने आज दिलासा दिला. उत्तर दिल्लीतील एका सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेल्या या डॉक्टरविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तसेच हा व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी या डॉक्टरला निलंबितही करण्यात आले आहे.
मात्र ही एफआयआर का दाखल करण्यात आली, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला विचारला. तसेच या डॉक्टरला त्रास देण्यात येऊ नये, अशी सूचनाही केली. डॉक्टर आणि परिचारिका हे करोना योद्धा आहेत आणि त्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे, असे न्या. अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील पिठाने सांगितले.
करोना रुग्ण आणि करोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांच्या मृतदेहांच्या हाताळणीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून सुनावणीसाठी दाखल करून घेतले आहे. त्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने वरील सूचना केली. तसेच रुग्णांना दिली जाणारी वागणूक आणि मृतदेहांच्या हाताळणीबाबत केंद्र सरकार आणि इतरांकडून प्रतिज्ञापत्रही न्यायालयाने मागवले आहे.