नवी दिल्ली – भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वात मानाचा समजला जात असलेल्या खेलरत्न पुरस्कारासाठी भारताची नवोदित धावपटू हिमा दास हिच्या नावाची शिफारस आसाम सरकारच्या क्रीडा विभागाने केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडे केली आहे.
2018 सालापासून हिमाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या स्पर्धांमध्ये सातत्याने सरस कामगिरी केली आहे. तिने आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदकाने दोन वर्षांपूर्वी अफलातून सलामी दिली. त्यानंतर सातत्याने देशाला व राज्याला पदके मिळवून दिली आहेत. तिच्या याच कामगिरीची दखल घेत आसाम सरकारकडून हिमाची शिफारस करण्यात आली आहे.
हिमाला दोन वर्षांपूर्वी अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले होते. यंदाच्या वर्षी या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेली हिमा सर्वात तरुण खेळाडू ठरली आहे. यंदा हिमापूर्वी भालाफेकपटू नीरज चोप्रा, कुस्तीपटू विनेश फोगट, टेबल टेनिसपटू मनिका बात्रा, महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल व क्रिकेटपटू रोहित शर्मा यांच्या नावांचीही शिफारस करण्यात आलेली आहे.