हैदराबाद: एकीकडे धोकादायक बनलेला करोना विषाणूच्या प्रसाराला लगाम घालण्यात अपयश येत असतानाच दुसरीकडे करोनाबाबत खोट्या बातम्यांचा व्हायरस सोशल मीडियावर पसरवला जात आहे. करोनाबाधित नसतानाही अशा लोकांविषयी चुकीचा मेसेज समाजात पसरवला जात आहे.
यामुळे अनेक लोकांना आणि त्यांच्या कुटुंबांना त्रास सहन करावा लागत आहे. सायबर क्राइमचा शोध घेणाऱ्या पोलिसांना आता ही नवीन डोकेदुखी बनली आहे.
यातून राजकीय नेतेही सुटलेले नाहीत. सत्ताधारी पक्षाचे आमदार पद्मा देवंदर रेड्डी हे करोना बाधित असल्याची अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरली. मात्र नंतर आमदारांनी करोनाबाधित नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या समर्थकांनी पोलिसांत याबाबत तक्रार नोंदवली आहे. तरीही खोट्या बातम्यांची साखळी अजूनही सुरूच आहे. पाच दिवसांपूर्वीच हैदराबादचे उपमहापौर यांच्याविषयीही करोना बाधित असल्याच्या खोट्या बातम्या सोशल मीडियावर पसरवल्या गेल्या.
यात अनेक सर्वसामान्य लोकांच्या फोटोखाली करोना बाधित असल्याचे लिहून सोशल मीडियावर असे फोटो टाकले जात आहेत. यामुळे लोकांमध्ये संभ्रम आणि भीती निर्माण झाली आहे. या अफवांवर पोलिसांनी लगेच नियंत्रण आणण्याची मागणी होत आहे.