वायसीएमच्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश : आईही “करोनामुक्त’
पिंपरी – जन्मतःच आईपासून करोनाची लागण झालेल्या नवजात बालकावर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. बाळासह आईदेखील करोनामुक्त करण्यात वायसीएममधील डॉक्टरांना यश आले आहे.
एका खासगी रुग्णालयात प्रसुती झालेल्या महिलेला दुसऱ्या दिवसांपासून सर्दी व खोकल्याचा त्रास सुरु झाला. त्यामुळे तिच्यासह बाळाला वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीनंतर दोघांचेही अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. नवजात बालकाला धाप लागत असल्यामुळे त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. बालकाच्या आईलादेखील करोना झाल्याने स्वतंत्र वॉर्डात स्त्रीरोगतज्ज्ञाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले.
दरम्यान बालकाला ऑक्सिजन लावण्यात आला. त्यामुळे त्याला आईचे दूध देता येत नव्हते. उपचारास बालकांने दोन ते तीन दिवसांत चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर बाळाच्या आईच्या प्रकृतीतदेखील सुधारणा झाली. बारा दिवसानंतर आई व बाळ दोघांनाही घरी पाठविण्यात आले आहे.
खासगी रुग्णालयात महिलेची प्रसुती झाली होती. दुसऱ्या दिवशीच बाळाला आमच्याकडे आणले होते. दोघांचीही चाचणी केली असता ते पॉझिटिव्ह असल्याचे निष्पण्ण झाले. उपचार सुरु केल्यानंतर दोन दिवसांत बाळाने चांगला प्रतिसाद दिला. शहरात पहिल्यांदाच एवढ्या लहान बाळावर करोनाचे उपचार करण्यात आले. वायसीएममधील डॉक्टरांच्या प्रयत्नाने त्याला यश आले. सद्यस्थितीत आई व बाळ दोघेही सुखरुप आहे.
– डॉ. दीपाली अंबिके, बालरोग तज्ज्ञ