पावसामुळे नुकसान, काढणी थांबल्याने भाववाढ
मेथी गड्डी 30 रुपये; कोथिंबीर गड्डी 25 रुपये
पुणे – मान्सूनच्या आगमनामुळे पुणे जिल्ह्यासह विभागात ठिकठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. तर, काही ठिकाणी पावसामुळे भाज्यांची काढणी थांबली आहे. त्याचाच परिणाम म्हणून बाजारात मेथी आणि कोथिंबिरची आवक घटली आहे. मात्र, मागणी अधिक असल्याने घाऊक आणि किरकोळ बाजारात गड्डीचे भाव वाढले आहेत. किरकोळ बाजारात मेथी गड्डीचा भाव 30, तर कोथिंबिरीच्या गड्डीचा भाव 25 रुपयांवर पोहोचला आहे.
पावसामुळे शेतकऱ्यांना शेतातील कोथिंबीर, मेथीसह अन्य पालेभाज्यांची काढणी करणे अशक्य होत आहे. त्यातच करोनाच्या भीतीमुळे शेतकरी बाजारात कमी माल पाठवित आहेत. त्यामुळे मंगळवारी घाऊक बाजारात मागणी अधिक आणि आवक कमी अशी स्थिती निर्माण झाली. त्यामुळेच मेथी आणि कोथिंबिरीच्या भावात वाढ झाल्याची माहिती भाजीपाला विभाग प्रमुख डी. डी. कळमकर यांनी दिली.
कळमकर म्हणाले, पुणे विभागातून 63 हजार 810 कोथिंबिरीच्या गड्डीची आवक झाली. तर 9 हजार 150 मेथीच्या गड्डीची आवक झाली. घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या गड्डीला 6 ते 12 रुपये भाव मिळाला. तर, मेथीच्या गड्डीला 12 ते 15 रुपये दर मिळाला. शेपूच्या 400 गड्डीची आवक झाली. त्यास 5 ते 8 रुपये भाव मिळाला. कांदापातच्या 5 हजार 750 गड्डीची आवक झाली. त्यास 5 ते 7 रुपये दर मिळाला. पालकच्या 6 हजार 600 गड्डीची आवक झाली. त्यास 5 ते 6 रुपये दर मिळाला. आवक घटल्यामुळे भाव वाढले आहेत. मात्र, पालेभाज्यांची आवक वाढल्यानंतर भाव कमी होतील, असा अंदाजही कळमकर यांनी व्यक्त केला.
घाऊक बाजारात भाव वाढल्याने किरकोळ बाजारात मेथी, कोथिंबिरीचे भाव वाढले आहेत. मेथीच्या एका गड्डीचा भाव 30 रुपये, तर कोथिंबिरीच्या गड्डीचा भाव 25 रुपयांवर पोहोचला आहे. इतर प्रकारच्या सर्व पालेभाज्यांचे भाव मात्र रविवारच्या तुलनेत स्थिर आहेत.
– प्रकाश ढमढेरे, कार्याध्यक्ष, किरकोळ व्यापारी संघटना, मार्केट यार्ड