सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर एकीकडे त्याच्याबद्दलच्या सद्भावना व्यक्त होत आहेत. तर दुसरीकडे बॉलीवूडमधील अंतर्गत कुरबुरी चव्हाट्यावर यायला लागल्या आहेत. फिल्म इंडस्ट्रीमध्ये कशाप्रकारे कलाकारांना वागवले जाते, याचे किस्से एक एक जण सांगायला लागला आहे.
बॉलीवूडमध्ये अतिशय खालच्या पातळीवरचे राजकारण केले जात असल्याचे रविनाने म्हटले आहे. आपल्याला काही हिरो आणि हिरोंच्या गर्लफ्रेंडनी सिनेमांमधून काढले होते. बॉलीवूडच्या या अंतर्गत राजकारणाला “गर्ल गॅंग कॅम्प’ असे म्हणून चिडवले जात असते.
काही हिरोंच्या गर्लफ्रेंड, आजूबाजूचे चमचे पत्रकार हे यासाठी कार्यरत असतात. बनावट स्टोऱ्या रचून ते कलाकारांना बदनाम करतात. अशा खोट्या स्टोऱ्यांमुळे काही कलाकारांचे करिअरच संपवून टाकले गेले आहे.
बॉलीवूडमध्ये आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. या संघर्षामध्ये काही जण स्वतःला टिकवून ठेवण्यात यशस्वी होतात. तर काही जण स्वतःलाच संपवून टाकतात, असे रविनाने म्हटले आहे.
तिच्या या पोस्टमध्ये तिचा रोख कोणाकडे होता, हे स्पष्ट झालेले नाही. पण तिच्या हिरोंच्या गर्लफ्रेंडच्या उल्लेखावरून काही अंदाज बांधता येऊ शकतो.