पिंपरी – पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि. 13) दुपारी अडीचच्या सुमारास माण रोड येथे उघडकीस आली.
याप्रकरणी पत्नीसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकनाथ सोनबा बोरकर (रा. शिवतेजनगर, हिंजवडी) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा
संकेत एकनाथ बोरकर (वय 26) यांनी रविवारी (दि. 14) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ललिता उर्फ आशा एकनाथ बोरकर, किसन मारुती आमले, कैलास पवार अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपी आशा हिने नातेवाईक किसन आमले आणि चालक कैलास पवार यांना सोबत घेऊन एकनाथ यांचा छळ केला. तसेच, पोलिसांकडे खोट्या तक्रारी करून त्यांचे मानसिक खच्चीकरण केले. शेवटी या तिघांच्या त्रासाला कंटाळून एकनाथ यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.