नवी दिल्ली : जगात एकीकडे कोरोनाने हैदोस घातला आहे तर दुसरीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमारेषेवर दहशतवादी कारवायांना ऊत आला असल्याचे दिसत आहे. कारण काश्मीर खोऱ्यात राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांनी मोठी मोहीम उघडली आहे. याच मोहिमे अंतर्गत मंगळवारी सकाळी जम्मू-काश्मीरच्या शोपियन जिल्ह्यात झालेल्या चकमकीमध्ये सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे.
Three terrorists were killed in the encounter. We will ask people, who are claiming to be their parents, to come and identify the bodies. It was a clean operation, there was no collateral damage: IG Police Kashmir, Vijay Kumar on encounter in Shopian. #JammuAndKashmir pic.twitter.com/xNPSCjRpYx
— ANI (@ANI) June 16, 2020
शोपियनच्या तुर्कवानगाम भागात ४४ राष्ट्रीय रायफल्स आणि दहशतवाद्यांमध्ये पहाटे पाचच्या सुमारास चकमक सुरु झाली. जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरपासून तुर्कवानगाम ६० किलोमीटर अंतरावर आहे. स्पेशल ऑपरेशन ग्रुप आणि सीआरपीएफची १७८ बटालियनही या कारवाईमध्ये नंतर सहभागी झाली होती. पहाटे ६.३० सुमारास ही कारवाई संपली. कंठस्नान घातलेल्या तीन दहशतवाद्यांची ओळख अजून पटलेली नाही. शोध मोहिम सुरु आहे अशी माहिती काश्मीर पोलिसांनी टि्वट करुन दिली. घटनास्थळावरुन दोन AK-47 रायफल जप्त करण्यात आल्या आहेत.
शनिवारी जम्मू-काश्मीरच्याच कुलगाम जिल्ह्यामध्ये हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. आठवडयाभरातील शोपियनमधील हे चौथे एन्काऊंटर आहे. सीआरपीएफ, राष्ट्रीय रायफल्स आणि स्पेशल ऑपरेशन ग्रुपने १० जून रोजी केलेल्या कारवाईत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.